परवानगी न घेताच भर चौकात खोदकाम

नेहरू रस्त्यावरील प्रकार; स्वारगेट पोलिसांत गुन्हा दाखल
महर्षीनगर (प्रतिनिधी) –
पुणे महानगरपालिकेच्या ड्रेनेज विभागाकरिता काम करणाऱ्या ठेकेदाराने ड्रेनेज पाइपलाइनचे काम परवानगी न घेताच सुरू केल्याने वाहतूक विभागाकडून संबंधित ठेकेदारा विरोधात स्वारगेट पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यात आली असून, ठेकेदारावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मार्केटयार्डकडे जाणारा मुख्य रस्ता म्हणून नेहरू रस्त्याची ओळख आहे. याच रस्त्यावर डायस प्लॉट चौकात पालिकेकडून ड्रेनेज पाइपलाइनचे काम सुरू करण्यात आले आहे. यामुळे डायस प्लॉट चौकात वाहतूक कोंडी होऊ लागली आहे. वाहतूक विभागाची परवानगी न घेताच हे काम सुरू करण्यात आल्याने तसेच वाहतूक कोंडी होऊ नये, सदर ठिकाणी अपघात होऊ नये याबाबत काळजी घेतली जात नसल्याने ठेकेदारावर पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली आहे.

लॉकडाऊन शिथिल करण्यात आल्याने रस्त्यावरील वाहतूक वाढली आहे. त्यातच विना परवानगी खोदकाम होत असल्याने या रस्त्यावर कोंडी होऊ लागल्याने याची दखल घेत वाहतूक विभागाने ठेकेदाराविरोधात कडक कार्यवाही केली आहे.
दरम्यान, कोविड काळातील अत्यावश्‍यक काम असल्याने सदर काम केलेले आहे. या कामाबाबत परवानगी घेतलेली आहे. माझ्या नावावर गुन्हा दाखल झाल्याबद्दल माहिती घेणार असल्याचे ठेकेदार दिलीप कांबळे यांनी सांगितले.

वाहतूक विभागाच्या परवानगीशिवाय खोदकाम केल्याने वाहतूक कोंडी होत आहे. यामुळे महानगरपालिकेच्या ठेकेदारावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वाहतूक कोंडी होऊ नये म्हणून काळजी घेत आहोत.
– सूरज राजगुरू, सहाय्यक पोलीस निरीक्षक, वाहतूक विभाग स्वारगेट

संबंधित कामाच्या वर्क ऑर्डर प्रतीवर अधिकाऱ्याच्या सहीसह नावसुद्धा असणे बंधनकारक आहे. परंतु, ऑर्डरवर अधिकाऱ्याचे नाव नसल्याने नियम मोडीत काढण्याचा हा प्रकार आहे. आयुक्तांकडे तक्रार करणार आहे.
– भरत सुराणा, सामाजिक कार्यकर्ते

Leave a Comment