ऐतिहासिक मठाची खोदाई; जिल्हाधिकाऱ्यांकडून दखल

सोनई – नेवासा तालुक्‍यातील खेडले परमानंद येथील पुरातन ऐतिहासिक वास्तू शिवभारतकार कवींद्र परमानंद यांच्या ऐतिहासिक मठात रात्रीच्या वेळेस अज्ञात व्यक्तीकडून होत असलेल्या खोदकामाचा धक्कादायक प्रकार नुकताच ग्रामस्थांच्या निदर्शनास आला. त्यामुळे एकच खळबळ उडाली होती. याबाबत दैनिक प्रभातने वृत्त प्रकाशित केले होते. याची जिल्हा प्रशासनाने दखल घेत सदरचे खोदकाम धनासाठी होते की आणखी कुठल्या कारणासाठी याबाबतचा अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत.

शिव भारतकार कवींद्र परमानंद यांच्या मठात ध्यान मंदिरात व सभा मंडपाच्या गुप्त खोलीत हे उत्खनन काही दिवसांपूर्वी झालेले आहे. त्यामध्ये जाळे दिसून आले. झालेले उत्खनन हे गुप्त ठिकाणी आडमार्गी असल्यामुळे हे ग्रामस्थांच्या लक्षात आले नव्हते. याबाबतची माहिती कळताच ग्रामस्थांनी जिल्हाधिकारी यांच्याशी संपर्क साधला.

क्षणाचा ही विलंब न करता जिल्हाधिकारी यांनी तत्काळ महसूल विभागाला चौकशीचे आदेश दिले. आज नायब तहसीलदार किशोर सानप, सोनई पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक माणिक चौधरी, तलाठी भाऊसाहेब नवाळे यांच्या संयुक्त पथकाने संबंधित ठिकाणाची पाहणी करून पंचनामा केला. लवकरच संबंधित घटनेचा अहवाल जिल्हाधिकाऱ्यांना सादर करणार असल्याची माहिती दिली.

संबंधित घटनेमुळे शिवकालीन ऐतिहासिक वास्तूची विटंबना झालेली आहे. त्यामुळे सदर घटनेचा सखोल तपास करून दोषींवर योग्य ती कारवाई करण्यात यावी, अशी मागणी खेडले परमानंद ग्रामस्थांच्या वतीने करण्यात येत आहे. ऐतिहासिक वास्तूची विटंबना केल्याप्रकरणी घटनेचा तपास करण्यात यावा, अशी मागणी ग्रामस्थांनी केली.