पुणे | शहरातील रस्ते खोदाई बंद

पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – पावसाळापूर्व रस्ते दुरुस्तीसाठी महापालिकेकडून शहरात ३० एप्रिलपासून रस्ते खोदाईस मनाई करण्यात आली आहे. त्यानुसार ही खोदाई बंद करण्यात आली आहे. मात्र, त्याच वेळी महापालिकेच्या समान पाणी योजनेचे काम अंतिम टप्प्यात असल्याने या कामाच्या खोदाईसाठी मात्र सुविधा देण्यात आली आहे, तसेच, महावितरण आणि एनएनजीएलच्या तातडीच्या कामांनाही या नियमातून सवलत देण्यात आल्याचे महापालिकेच्या पथ विभागाचे प्रमुख अनिरुद्ध पावसकर यांनी सांगितले.

महापालिकेने ऑक्टोबर २०२३ ते एप्रिल २०२४ पर्यंत शहरात ४८ किलोमीटरच्या रस्ते खोदाईस परवानगी दिली होती. मात्र, मार्चपर्यंत केवळ २५ किलोमीटरच खोदाई झाली होती. त्यामुळे गेल्या काही वर्षांच्या तुलनेत यंदा रस्ते खोदाई कमी झालेली असल्याने पुणेकरांना पावसाळयात खड्डयांचा सामना करावा लागणार नाही, अशी अपेक्षा आहे.

पाणी योजनेच्या खोदाईचे नियोजन
महापालिकेच्या समान पाणी योजनेचे काम अंतिम टप्प्यात आहे. त्यामुळे महापालिकेकडून या योजनेच्या कामास जलवाहिनी टाकण्यासाठी खोदाईस मुभा देण्यात आली आहे. मात्र, हे काम करताना सलग खोदाई न करता प्रत्येक ५० मीटर अंतर खोदाई करावी.

त्यानंतर रस्ता दुरुस्त करून मगच पुढील खोदाई करावी, असे बंधन पाणीपुरवठा विभागास घातल्याचे पावसकर यांनी स्पष्ट केले. समान पाणी योजनेत सुमारे १६०० किलोमीटरच्या नवीन जलवाहिन्या टाकण्यात येणार असून, सुमारे १२०० किलोमीटर खोदाई पूर्ण झालेली आहे, तर उर्वरीत काम पूर्ण करण्याचे महापालिकेचे मार्च २०२४ पर्यंतचे नियोजन आहे.

१५ मे पूर्वीच रस्ते दुरुस्ती
शहरातील रस्ते दुरुस्तीचे काम १५ मे पूर्वीच पूर्ण करण्याचे नियोजन असल्याची माहिती पावसकर यांनी दिली. प्रशासनाने लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लक्षात घेऊन मार्च महिन्यापासूनच परिमंडळ कार्यालये आणि पथ कार्यालयाकडून खड्डे दुरुस्त करण्यात येत आहेत. त्यातच उन्हाची तीव्रता असल्याने रस्ते दुरुस्तीस त्याचा फायदा होत असल्याचेही पथ विभागाकडून सांगण्यात आले.