अरुणाचल प्रदेशातील चीनी सीमेवरील तवांग बोगद्याचे खोदकाम पूर्ण; लष्करासाठी आहे याचे खास महत्व

इटानगर – अरुणाचल प्रदेशातील चीनच्या सीमेला लागून असलेल्या भागाचे रक्षण करण्याच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाच्या अशा मानल्या गेलेल्या तवांग-कामेंग बोगद्याचे काम वेगाने सुरू असून जून 2022 च्या ठरलेल्या मुदतीच्याआधीच हे काम पूर्ण होईल अशी चिन्हे आहेत. त्यामुळे तवांगजवळील प्रत्यक्ष नियंत्रण रेषेपर्यंत जवान, शस्त्रे आणि वाहनांची वेगाने ने-आण करणे शक्य होणार आहे. पश्चिम कामेंग जिल्ह्यातील हा प्रकल्प देशाच्या संरक्षणाच्या दृष्टीने तसेच या भागाच्या सामाजिक-आर्थिक प्रगतीच्या दृष्टीने महत्त्वाचा मानला जातो.

से-ला पास या नावाने ओळखल्या जाणारा हा बोगदा खोदण्यासाठी व बांधकामासाठी 700 कोटी रुपये खर्च येणार आहे. 2018 मध्ये सरकारने या प्रकल्पाची घोषणा केली होती. समुद्रसपाटीपासून 13,000 फूट उंचीवर असणाऱ्या या दुपदरी बोगद्यामुळे तवांगपर्यंत पोचण्यासाठीचा एक तासाचा अवधी कमी होणार आहे. बर्फवृष्टीतही हा बोगदा चालू राहिल अशी रचना करण्यात आली असल्याचे या प्रकल्पाचे संचालक कर्नल परिक्षित मेहरा यांनी सांगितले आहे. हिवाळ्यात हिमवृष्टी होत असताना तवांगसारख्या 14,000 फूट उंचीच्या ठिकाणी पोचणे आणि सैन्याची हलवाहलव करणे, शस्त्रास्त्रे नेणे लष्करासाठी आव्हानात्मक ठरते. वर्षातून किमान तीन महिने तरी हिमवृष्टीमुळे निर्माण होणाऱ्या समस्यांना तोंड द्यावे लागते.

आता त्यावर मात करता येणार आहे. सीमा रस्ते संघटनेकडे (बीआरओ) या प्रकल्पाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. या प्रकल्पांतर्गत तीन बोगदे बांधण्यात येणार आहेत. त्यामध्ये दुपदरी मुख्य बोगदा, दुसरा सुटकेसाठीचा बोगदा (एस्केप टनेल) आणि तिसरा एक लहान बोगदा. मुख्य बोगदा आणि तिसरा लहान बोगदा यांना जोडणाऱ्या रस्त्याचे कामही बीआरओ कडे देण्यात आले आहे.

मुख्य बोगदा आणि सुटकेसाठीचा बोगदा हे दोन्ही प्रत्येकी 1,555 मीटर लांबीचे आहेत. त्यांना समांतर लहान बोगदा 1980 मीटरचा आहे. त्यांना जोडणारा रस्ता 1200 मीटर लांबीचा आहे. रोज लष्कराची आणि अन्य नागरिकांची चार हजार वाहने या बोगद्याचा वापर करतील असा अंदाज आहे. अगदी बोफोर्स तोफांसह अन्य अवजड वाहनेही या बोगद्यातून जाऊ शकणार आहेत.

से-ला बोगदा हा प्रकल्प प्रत्यक्षात चीनी सीमेजवळील बालीपाडा-चारदुआर-तवांग मार्गाचा भाग आहे. मुख्य बोगद्याच्या खोदाईचे काम मागील आठवड्यात पूर्ण झाले. सर्व ऋतुंमध्ये त्याचा वापर करता येणार आहे हे या बोगद्याचे प्रमुख वैशिष्ट्य आहे. या बोगद्यांच्या कामासाठी अत्याधुनिक ऑस्ट्रीयन तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येत असून त्या कामी 50 अभियंते आणि 500 मजूर गुंतलेले आहेत.

ऑस्ट्रीयन तंत्रानुसार खडकांचा अभ्यास करण्यात आला असून बोगद्याला आधार देण्याच्या कामाचे आरेखनही त्यानुसार करण्यात आलेले आहे. या प्रकल्पाची जबाबदारी असणारे कर्नल परिक्षित मेहरा यांनी आयआयटी दिल्ली येथून एम. टेक पदवी संपादन केली असून आणखी एक पदव्युत्तर पदवी ऑस्ट्रियातून संपादन केली आहे. या आधी रोहतांग येथील अटल बोगद्याच्या प्रकल्पावर ते सुरवातीपासून शेवटपर्यंत पाच वर्षे काम करत होते.