रिऍल्टी क्षेत्रात उमेद वाढली

मुंबई – जुलै ते सप्टेंबर या तिमाहीत पुण्यातील घर विक्रीत तीन पटीने वाढ झाली असल्याचे एका संस्थेच्या पाहणी अहवालात म्हटले आहे. या तिमाहीत पुण्यात 5,921 इतक्‍या घरांची विक्री झाली .गेल्या वर्षी या तिमाहीत पुण्यात केवळ 1,344 इतक्‍या घरांची विक्री झाली होती.

जे एल एल इंडिया या संस्थेने देशातील आठ मोठ्या शहरातील घर विक्रीच्या आकडेवारीचा अभ्यास करून तयार केलेल्या अहवालात ही माहिती देण्यात आली आहे. या अहवालातील माहितीनुसार जुलै ते सप्टेंबर या कालावधीत आठ शहरांमध्ये घर विक्री दुपटीने वाढून 32, 358 विकली गेली. गेल्या वर्षी या तिमाहीत केवळ 14,415 घरांची विक्री झाली होती. तर एप्रिल ते जून या तिमाहीतमध्ये 19,615 इतक्‍या घरांची विक्री झाली होती.

गेल्या आठवड्यात ऍनारॉक या संस्थेने अशाच प्रकारची माहिती जाहीर केली होती. त्यामुळे निर्बंधाचा रिऍल्टी क्षेत्रावरील परिणाम वेगाने कमी होत असल्याचे दिसून येत आहे. पुण्यासह मुंबई, दिल्ली, कोलकाता, चेन्नई, बंगळुरू, हैदराबाद, अहमदाबाद या शहरातील आकडेवारी संकलित करून हा अहवाल तयार करण्यात आला आहे.

या अहवालातील माहितीनुसार जानेवारी ते सप्टेंबर या कालावधीत 8 शहरातील विक्री 47 टक्‍क्‍यांनी वाढवून 77,576 इतकी झाली आहे. गेल्या वर्षी या कालावधीत 52,619 इतक्‍या घरांची विक्री झाली होती. एक तर व्याजदर सध्या कमी पातळीवर आहेत. त्यामुळे अनेक जण खरेदीचा निर्णय घेत आहेत. त्याचबरोबर आहे ती इन्व्हेंटरी लवकर संपवून भांडवल रिकामे करण्यासाठी विकासक आक्रमक सवलती देत आहे. त्यामुळे घरांची विक्री वाढत आहे.

करोना रुग्णांची संख्या कमी होत आहे आणि लसीकरण वाढत असल्यामुळे नागरिक आपले व्यवहार करण्यासाठी घराबाहेर पडत आहेत. यामुळेही या क्षेत्रामध्ये सकारात्मक वातावरण निर्मिती झाली असल्याचे या अहवालात नमूद करण्यात आले आहे.

मात्र करोनापूर्व काळात या क्षेत्रामध्ये बराच काळ बंदी रेंगाळली होती. त्यामुळे देशांमध्ये सध्या न विकलेल्या घरांची संख्या अजूनही 4.78 लाख युनिट इतकी आहे. ही तयार घरे विकण्यासाठी साधारणपणे 5.3 वर्ष इतका कालावधी लागू शकतो. त्याचबरोबर ही इन्व्हेंटरी संपत नाही तोपर्यंत घरांच्या किमतीत फार वाढ होण्याची शक्‍यता कमी असल्याचे समजले जाते.

या क्षेत्रात बंगळूरू शहरातील घडामोडी जास्त वेगवान आहेत. जुलै -सप्टेंबरदरम्यान बंगळुरूमध्ये जोरदार विक्री होऊन 5100 इतकी घरे विकली गेली. गेल्या वर्षी या तिमाहीत केवळ 1,742 घरांची विक्री झाली होती. मात्र चेन्नई शहरातील घर विक्री कमी होऊन 1,500 झाली आहे. हैदराबाद शहरातील घर विक्री दुपटीने वाढून 4,418 युनिट इतकी झाली आहे. दिल्लीतील घर विक्री दुपटीने वाढून 6,789 इतकी झाली आहे. कोलकाता शहरातील घर विक्री पाचपटीने वाढून 1,974 युनिट इतकी झाली आहे.अहमदाबाद शहरातील घर विक्री वाढली आहे.