अनुभवा मौज, मज्जा, मस्तीची एक धमाल सफर; ‘जग्गु आणि जुलिएट’ सिनेमाचं नवीन पोस्टर आउट

मुंबई – ‘पुनीत बालन स्टुडीओजची निर्मिती असलेला “जग्गु आणि ज्युलिएट’ या चित्रपटाचा ऑफिशल ट्रेलर काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झाला होता. देवभूमी अर्थात उत्तराखंड येथून ही लव्हस्टोरी सुरु होत असल्याचे ट्रेलर मध्ये पाहायला मिळत आहे. गेल्या अनेक दिवसांपासून या चित्रपटाची हटके नावामुळे खूपच चर्चा होती. अभिनेता अमेय आणि अभिनेत्री वैदेही परशुरामी या चित्रपटात मुख्य भूमिकेत झळकणार आहेत.

दरम्यान, ‘जग्गु आणि ज्युलिएट’ चित्रपटात अमेय वाघ एका आगरी कोळी तरुणाच्या भूमिकेत तर अभिनेत्री वैदेही परशुरामी विदेशातून आलेल्या तरुणीच्या भूमिकेत असल्याच्या पाहायला मिळाले. चित्रपटाची उत्कंठा चांगलीच वाढलेली असताना नुकतंच या चित्रपटातील नवीन पोस्टर प्रदर्शित करण्यात आलं असून, यामध्ये चित्रपटातील सर्वच कलाकार दिसून येत आहे. ‘जग्गू आणि जुलिएट’ नावावरूनच हा चित्रपट काहीतरी हटके घेऊन येणार हे निश्चित झालं होत.

त्यात ‘तवाफ्राय प्रेमाची रवाफ्राय लव्हस्टोरी’ या टॅगलाईनमुळे उत्कंठा आणखी वाढली होती. या चित्रपटामुळे अमेय-वैदेही ही जोडी ‘झोंबिवली’ या चित्रपटनानंतर पुन्हा एकदा एकत्र दिसणार आहे. 2008 मध्ये ‘यलो’ या चित्रपटाद्वारे सामाजिक भान असलेला विषय हाताळणारे महेश लिमये यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. येत्या 10 फेब्रुवारीला हा चित्रपट सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे.