हनी ट्रॅपद्वारे तरुणाकडून खंडणी वसूल

फलटण – हनी ट्रॅपद्वारे एका तरुणाकडून 50 हजार रूपयांची खंडणी वसूल केल्याप्रकरणी सात जणांविरूध्द फलटण शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. या प्रकरणामुळे तालुक्‍यात एकच खळबळ उडाली आहे. फलटण शहर पोलीस ठाण्यातून मिळालेल्या माहितीनुसार, फलटणच्या पाच बत्ती चौकात दि. 5 जुलै रोजी दुपारी दीडच्या सुमारास साक्षी उर्फ मोनिका किसन मोहिते (मूळ रा. शिंदेवाडी, ता. फलटण) हिने फिर्यादी तरुणास मला तुला भेटायचं व पाहायचे आहे असे म्हणून रूमवर बोलवून घेतले. तत्पूर्वी त्या ठिकाणी तिचे इतर सहा साथीदार आधीच हजर होते.

त्यांनी तू कुठला आहेस, आमच्या बहिणीजवळ काय करतोस, असे म्हणून मारहाण केली. संशयित ऋषिकेश प्रल्हाद बोडरे (वय 23) याने फिर्यादी तरुणाचा मोबाइल जबरदस्तीने काढून घेऊन गाडीमध्ये बसवून जुन्या आयटीआय इमारतीजवळ नेले. तेथे लाथाबुक्‍क्‍यांनी मारहाण करून साक्षीला सांगून तुझ्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल करतो, असे धमकावले. तसेच गुन्हा दाखल करायचा नसेल तर तुला दोन लाख रुपये द्यावे लागतील असे म्हणून फिर्यादी तरुणाचा व्हिडिओ काढला. तसेच यातील महिला संशयिताने पोलीस असल्याचे सांगून तू कुणाच्या घरात घुसतो? तुला केसमध्ये गुंतवते असे म्हणून आरसी बुक काढून घेतले.

त्याच्या खात्यावर पैसे आहेत आणि ते पैसे पोलिसांचे खात्यावर टाकून घ्या व तो पोलिसांना लाच देतो असे म्हणून त्यावर आणखी एक गुन्हा दाखल करून घेते, अशी धमकी देत हाताने मारहाण केली आहे. फिर्यादी तरुणास त्यांनी पैशाची मागणी केली. तसेच त्याच्याजवळ पैसे नसल्याने मित्राकडून ऑनलाइन पैसे घेऊन ते 50 हजार रुपये एटीएममधून परस्पर काढून घेतले.

याप्रकरणी शहर पोलिस ठाण्यात साक्षी उर्फ मोनिका किसन मोहिते (रा. पाचबत्ती चौक), ऋषीकेश प्रल्हाद बोडरे (वय 23), धीरज अमोल लगाडे (वय 19), प्रतीक विजय भंडलकर (वय 19, तिघेही रा. खुंटे, ता. फलटण), सौ. सुहासिनी योगेश अहिवळे (वय 29, मूळ रा. मंगळवार पेठ, फलटण, हल्ली रा. बिरदेव नगर, जाधववाडी, ता. फलटण) या पाच जणांविरुद्ध विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल करुन त्यांना अटक करण्यात आली. तसेच गुन्ह्यात सामील असणाऱ्या दोन अल्पवयीन मुलांनाही ताब्यात घेण्यात आले आहे. पाच संशयितांना न्यायालयासमोर हजर करण्यात येणार असून अल्पवयीन मुलांचा ताबा त्यांच्या नातेवाईकांकडे देण्यात येणार आहे.

पोलीस अधीक्षक समीर शेख, अतिरीक्‍त पोलीस अधिक्षक बापू बांगर, पोलीस उपअधीक्षक राहुल धस यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सुनील शेळके, सहाय्यक पोलिस निरीक्षक केनेकर, पोलिस उपनिरीक्षक सुरज शिंदे, पोलीस उपनिरीक्षक अमोल कदम, पोलीस उपनिरीक्षक दीपाली गायकवाड, पोलीस नाईक सचिन जगताप, पोलीस कॉन्स्टेबल सचिन पाटोळे, महेश जगदाळे यांनी हे प्रकरण उजेडात आणले. पोलीस उपनिरीक्षक सुरज शिंदे तपास करीत आहेत. दरम्यान, जर अशा प्रकारची घटना कोणाबरोबर घडली असेल तर त्यांनी फलटण शहर पोलिस ठाण्याशी संपर्क साधावा, त्यांचे नाव, पत्ता गोपनीय ठेवण्यात येईल, असे आवाहन फलटण शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुनील शेळके यांनी केले आहे.