पुणे जिल्हा | कामगाराकडून पन्नास हजारांचा अपहार

शिक्रापूर, (वार्ताहर)-  शिक्रापूर (ता. शिरुर) येथे कामगाराकडून पन्नास हजारांचा अपहार करण्यात आला. शरद रमेश गायकवाड (रा. वाडेगव्हाण, जि. अहमदनगर) याच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

शंकर जगताप यांचे ज्ञानराज ट्रेडर्स नावाने दुकान असून त्या माध्यमातून ते डायमंड कंपनीचे खाद्यपदार्थ वेगवगेळ्या दुकानांना देत असताना त्यांच्याकडे कामासाठी शरद गायकवाड हा कामगार ठेवलेला होता. शरद टेम्पोतून इतर दुकानदारांना मालाची विक्री करुन त्याचे पैसे गोळा करत होता.

नोव्हेंबर २०२३ मध्ये जगताप यांनी कामगार शरदकडे दुकानदारांना दिलेल्या मालाच्या वसुलीबाबत विचारणा केल्यानंतर काही दिवसांत शरदने कामावर येणे बंद केले.

जगताप यांनी स्वतः शिक्रापूर, कोरेगाव भीमा, पेरणे फाटासह अन्य ठिकाणी जाऊन दुकानदारांकडे पैशाबाबत विचारणा केली. दुकानदारांनी शरद याच्याकडे वेळोवेळी अनेकदा पैसे दिले असल्याचे समोर आले. त्यांनतर जगताप यांनी शरदला फोन केला असता त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. शरद याने अपहार केल्याचे निदर्शनास आल्याने शंकर नामदेव जगताप यांनी शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली आहे.