पुणे | कारागृहातून १४ मोबाइल नंबर वापरून खंडणीखोरी

पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – बापू नायर टोळीतील गुंड तरबेज सुतार याने थेट कारागृहात राहून खंडणीचे उद्योग सुरू ठेवल्याचे उघड झाले आहे. यासाठी त्याने कारागृहातून १४ वेगवेगळ्या मोबाइल क्रमांकांचा वापर करुन एका तरुणाकडे ३० लाख रु. खंडणीची मागणी केल्यावर हा प्रकार उघडकीस आला. दरम्यान, खंडणी विरोधी पथकाने दोघांना ताब्यात घेत भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. सागर धुमाळ आणि अविनाश मोरे अशी अटक आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी सागर पाठक (३४, रा. कात्रज) याने तक्रार दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मुख्य आरोपी गुंड तरबेज सुतार हा कुख्यात बापु नायर टोळीचा सदस्य आहे. त्याच्यावर खुनाच्या तीन गुन्ह्यांसह विविध गुन्हे दाखल आहेत. तो कोल्हापूर कारागृहात असताना त्याने सागर पाठककडून दहा लाखांची खंडणी उकळली. त्याला फोनवर खुनाची धमकी दिली होती.

तसेच काही गुंड प्रत्यक्षात घरी पाठवून दमही देण्यात आला होता. भीतीपोटी दहा लाखाची खंडणी दिल्यानंतरही तरबेजने आणखी ३० लाखाची खंडणी मागीतही होती. खंडणी न दिल्यास तीन गुंठे जागा नावावर करुन देण्यास सांगण्यात आले होते. नकार दिल्यावर तरबेजने गुंड पाठवून धमकावने सुरू होते. वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रताप मानकर यांच्या पथकाने दोघांना ताब्यात घेतले. अधिक तपास सहायक पोलीस निरीक्षक समीर कदम करत आहेत.

काय आहे प्रकरण –
सागर हा तरबेजचा वाहनचालक होता. सन २०१७ मध्ये एका गुन्ह्यात तरबेज फरार झाला. यानंतर फिर्यादीने नोकरी सोडून जमीन खरेदी-विक्री व्यवसाय सुरू केला. हे माहिती होताच तरबेजने फिर्यादीकडे दहा लाखांची खंडणी मागितली, त्यातील तीन लाख उकळलेही. मात्र, २०२२ मध्ये तरबेजला अटक झाली. यानंतरही तरबेजने कारागृहातून फोन करुन सागरला दमदाटी करत उरलेले सात लाख साथीदारांकरवी उकळले. मात्र, तरबेजने आणखी ३० लाखांच्या खंडणीची मागणी केल्यावर फिर्यादीने पोलिसांकडे धाव घेतली.