पुणे | खंडणी मागणाऱ्यास अटक

पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – माथाडीच्या नावे क्रिएटीसिटी मॉल येरवडा येथील वूडन स्ट्रीट फर्निचर कंपनीच्या प्रतिनिधीना धमकावून खंडणी मागणार्‍यास गुन्हे शाखेच्या खंडणीविरोधी पथकाने अटक केली. शेखर मारुती लोंढे (वय. 37, रा. नागपूर चाळ, येरवडा) असे त्याचे नाव आहे.

याप्रकरणी पोलिसांनी लोंढेविरुद्ध येरवडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. याबाबत ३३ वर्षीय व्यक्तीने तक्रार दिली आहे. हा प्रकार १८ जानेवारीपासून गुन्हा दाखल होईपर्यंतच्या कालावधीत सुरू होता.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादींनी आरोपी लोंढे याला कोणत्याही प्रकारची वर्क ऑर्डर दिली नसताना देखील तो क्रिएटीसिटी मॉल येथील वूडन स्ट्रीट फर्निचरच्या हाउस किपिंग व लेबर कॉन्ट्रॅक्ट, तसेच माथाडीचे महिन्याला अठरा हजार रुपये देण्यासाठी धमकावत होता, तसेच हाउस किपिंग आणि लेबरचे काम त्याच्याकडूनच घ्यायचे.

नाहीतर फिर्यादींना तेथे फिरकू देणार नाही, असे धमकावत होता. लोंढे याने फिर्यादींकडून बारा हजार रुपये बेकायदेशीर घेऊन जर आम्हाला काम दिले नाही, तर जीवंत सोडणार नाही, अशी धमकी दिली. याबाबत खंडणीविरोधी पथक दोनकडे फिर्यादींनी तक्रार दिली होती.

त्यानुसार पोलिसांनी लोंढे याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता, त्याच्याकडे संबंधित कंपनीची माथाडी संदर्भातील कोणतीही वर्क ऑर्डर नसल्याचे समोर आले, तसेच लोंढे माथाडी बोर्ड येथे नोंदणीकृत कामगार नसताना देखील फिर्यादीना धमकावून पैसे उकळल्याचे पुढे आले. त्यानुसार पोलिसांनी गुन्हा दाखल करून लोंढे याला बेड्या ठोकल्या आहेत.

ही कामगिरी अपर पोलीस आयुक्त शैलेस बलकवडे, उपायुक्त अमोल झेंडे, सहायक पोलीस आयुक्त सतीश गोवेकर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रताप मानकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक मोहनदास जाधव कर्मचारी विजय गुरव, संग्राम शिनगारे, सैदोबा भोजराव, अमोल पिलाने, चेतन चव्हाण, चेतन शिरोळकर यांच्या पथकाने केली.

माथाडी बोर्डात नोंदणीची बतावणी
आरोपी शेखर लोंढे याच्याकडे माथाडी संदर्भात कोणतीही वर्क ऑर्डर नाही. तो माथाडी बोर्डातील नोंदीत कामगार नसतानाही तो माथाडीच्या तक्रारदारांना धमकावत होता. त्यानुसार लोंढेविरुद्ध येरवडा पोलीस ठाण्यात खंडणीचा गुन्हा दाखल केला आहे.