विविध नमुने तपासणीसाठी “एनआयव्ही’वर प्रचंड ताण

शिरूर (प्रतिनिधी) – करोना विषाणूसारख्या संसर्गजन्य विषाणूशी लढण्यासाठी भारत सरकारच्या भारतीय आयुर्विज्ञान अनुसंधान परिषद संलग्न पुण्यातील राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्था (एनआयव्ही) राज्यात एकमेव असल्याने त्याच्यावर प्रचंड ताण येत आहे. त्यामुळे या संस्थेच्या विस्तारीकरणासाठी सुमारे 500 ते 600 कोटींचा निधी केंद्र सरकारने द्यावा यासाठी महाराष्ट्रचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे पत्रव्यवहार करून मागणी केली आहे, अशी माहिती शिवसेनेचे उपनेते तथा शिरूर लोकसभेचे माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी दिली.

करोनाप्रादुर्भाव किंवा संशयित रुग्णाच्या तपासणीसाठी महाराष्ट्रात पुण्यात एकमेव राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्था (एनआयव्ही) कार्यरत आहे. यामुळे सध्याच्या युद्धजन्य परिस्थितीमध्ये या संस्थेतील संशोधक, डॉक्टर, परिचारिका आणि कर्मचारी अहोरात्र काम करीत आहेत. मात्र, राज्यात किंबहुना देशात एकमेव संस्था असल्याने विविध नमुने तपासणीसाठी या संस्थेवर मोठा ताण येत आहे. तर संस्थेतील यंत्रणा अपुरी पडत आहे, अशी माहितीभविष्यात करोना सारख्या विषाणूंच्या प्रादुर्भावामुळे निर्माण होणाऱ्या आणीबाणी आणि युद्धजन्य परिस्थितीशी मुकाबला करण्यासाठी पुण्यातील राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेच्या विस्तारीकरणासाठी केंद्र सरकारने 500 ते 600 कोटींचा निधी देण्याची गरज आहे.

या निधीतून राज्यातील पूर्व, पश्चिम, दक्षिण व उत्तर विभागात राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेची प्रत्येकी एक – एक जागतिक दर्जाची अत्याधुनिक सोयी सुविधा असलेली प्रयोगशाळा उभारणे गरजेचे आहे. यामुळे पुण्यातील संस्थेवरील ताण कमी होऊन, एकाचवेळी मोठ्या प्रमाणावर नमुने तपासणी करणे शक्य होणार असून, रुग्णांना तातडीने उपचार मिळणे सुलभ होणार आहे.

यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्रव्यवहार करून राज्य सरकारच्या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मागणी करावी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना देखील पत्राद्वारे विनंती केली असल्याची माहिती आढळराव यांनी दिली.

Leave a Comment