“धर्माच्या नावे सुरू असलेला अतिरेक थांबावा”ज्येष्ठ विचारवंत रावसाहेब कसबे यांचे मत

 

प्रभात वृत्तसेवा पुणे, दि. 17 – आज आपल्यासमोर भांडवलशाहीला समजावून घेण्याचे मुख्य आव्हान आहे. भांडवलशाही ही धर्मव्यवस्थेचा अत्यंत चलाखीने उपयोग करून घेते, हे सुरूवातीला काही मूलतत्ववाद्यांवरून आणि आता देशात वाढत चालणाऱ्या धर्मसंस्थांवरून लक्षात येते. धर्माच्या नावाने सध्या जे काही सुरू आहे, त्यामुळे भारतानेही श्रीलंकेच्या दिशेने मार्गक्रमण सुरू केले आहे, असे मत ज्येष्ठ विचारवंत रावसाहेब कसबे यांनी व्यक्त केले.

सन 1948 मध्ये साने गुरूजींनी सुरू केलेल्या साधना साप्ताहिकाने अमृतमहोत्सवी वर्षात नुकतेच पदार्पण केले. त्यानिमित्त काढलेल्या “कालचे स्वातंत्र्य आमच्या दारात आलेच नाही’ या अंकांचे, अनिल अवचट यांनी संपादित केलेल्या “25 वर्षातील दलितांचे स्वातंत्र्य’ या आणि मधु लिमये यांनी लिहलेल्या, वासंती दामले यांनी अनुवादित केलेल्य “धर्मांधता : राज्यसंस्थेवरील घोर संकट’ या पुस्तकांचे प्रकाशन यावेळी करण्यात आले. तसेच, साधना साप्ताहिकाच्या गेल्या 50 वर्षांतील अंकांचे डिजिटल अर्काइव्ह व साधना प्रकाशनाची वेबसाइट यांचे प्रकाशन यावेळी करण्यात आले.

यावेळी साधना ट्रस्टचे अध्यक्ष विवेक सावंत, सचिव हेमंत नाईकनवरे, माजी अध्यक्ष विजया चौहान, साधनाचे संपादक विनोद शिरसाठ, अमरेंद्र धनेश्‍वर, अनिरूद्ध लिमये, मनोहर जाधव आदी उपस्थित होते. भारतीयांचा इतिहास गुलामगिरीचा आहे. भारतीय माणूस स्वातंत्र्याला घाबरणारा आहे. कारण, स्वातंत्र्य त्याला असुरक्षितता देते. तु जे करशील त्याची जबाबदारी तुझ्यावर आहे, हे सांगते आणि भारतीय माणूस जबाबदारी घ्यायला तयार नसतो. त्याला संरक्षण हवे असते. म्हणूनच सर्वात जास्त पैसा असलेली ठिकाणे ही धर्मस्थळे आहेत. फॅसिझमला ही स्थिती फार उत्तम आहे, असे मतही कसबे यांनी व्यक्त केले. तर, भांडवलशाही आंतर्विरोधात सापडली आहे. श्रीमंत लोक देश सोडत आहेत. याचा अर्थ अर्थव्यवस्था डबघाईला आली आहे. किसान आंदोलन हे थेट जागतिकीकरणाच्या विरोधात होते. म्हणून जगातील शेतकऱ्यांचे त्याच्याकडे लक्ष होते. असे सद्यपरिस्थितीचे विश्‍लेषण कसबे यांनी केले. सुहास पाटील यांनी सूत्रसंचालन केले.