डोळे करणार हृदयविकाराचे निदान; अमेरिकेतील संशोधकांचं महत्वाचं संशोधन

वॉशिंग्टन- हृदयविकार आणि स्ट्रोक यासारख्या घातक आजारांचे निदान करण्यासाठी जरी विविध प्रकारच्या चाचण्या केल्या जात असल्या तरी आता केवळ डोळ्यांच्या सहाय्याने या आजारांचे निदान करणे शक्‍य होणार आहे. अमेरिकेतील संशोधकांनी ही नवीन निदान पद्धती विकसित केली आहे.

अमेरिकेतील सॅन डियेगो येथील कॅलिफोर्निया विद्यापीठातील डॉक्‍टर्सनी या निदान पद्धतीचा शोध लावला आहे. या पद्धतीप्रमाणे केवळ डोळ्यांचे म्हणजेच रेटिनाचे स्कॅनिंग करून त्याआधारे हृदयविकार किंवा स्ट्रोक याचे निदान करणे शक्‍य होणार आहे. संशोधकांनी जुलै 2014 ते 2019 या कालावधीमध्ये सुमारे चार हजार रुग्णांवर याबाबत प्रयोग केले आणि त्यानंतर हे निष्कर्ष जाहीर करण्यात आले आहेत.

संशोधकांनी दिलेल्या माहितीप्रमाणे शरीरातील रक्ताभिसरण व्यवस्थित होत नसेल तर त्याचा परिणाम डोळ्यांवरही दिसतो आणि रक्ताभिसरण हे थेट हृदयविकार आणि स्ट्रोकची निगडित असल्याने या अभिसरण प्रक्रियेचे परिणाम डोळ्यांमध्ये दिसतात. त्याचा वापर करून हृदय विकार आणि स्ट्रोक यांचे निदान करणे शक्‍य होणार आहे.

हृदयविकाराच्या काळामध्ये रुग्णाच्या शरीरातील ऑक्‍सिजनचे प्रमाण कमी होत असते आणि डोळ्यातील रेटिनाच्या स्कॅनिंगच्या माध्यमातून ही ऑक्‍सिजनची लेव्हल समजणेही शक्‍य होणार आहे. हृदयविकार आणि स्ट्रोक यांचे निदान करणारी ही निदान पद्धती अतिशय सोपी वेदनारहित असल्यामुळे लवकरच व्यवहार्य पद्धतीने वापरात करण्यात येण्याची शक्‍यता आहे. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे खूपच आधी हृदयविकाराचे संकेत या चाचणीच्या माध्यमातून मिळू शकतात असा दावा संशोधकांनी केला आहे.