पुणे जिल्हा | महावितरणच्या उत्तराने शेतकरी हवालदिल

राहू, {भाऊ ठाकूर} – ‘दैव देत आणि कर्म नेत” ही जुनी म्हण राहू बेट परिसराला तंतोतंत लागू होत आहे. राहू बेट परिसर हा पूर्ण बागायत परिसर आहे. त्यामुळे पाण्याची मुबलकता बऱ्यापैकी आहे. परंतु लोडशेडीगमुळे नदीत पाणी असूनही पाणी देत नाही. महावितरणच्या अधिकाऱी, कर्मचाऱ्यांना प्रश्‍न विचारले तर ‘वरून’ असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना हा ‘वरून’ मात्र सापडला नाही.

भीमा नदीपात्रात पाणी असून उपयोग नाही तर त्याचा वापर देखील करता आला पाहिजे. सध्या बेट परिसरात शेतकऱ्यांवर फक्त नदीतील पाणी पाहण्याची वेळ आली आहे. त्याचा वापर करता येईना. महावितरणकडून कृषीपंपासाठी दिवसात तीन पाळ्यांमध्ये फक्त आठ तास वीज पुरवली जाते. परंतु आठ तासांमध्ये देखील लोडशेडिंग केले जाते.

हे लोडशेडिग फक्त पिंपळगाव सब स्टेशनचे नसते. त्याच्या वरिष्ठ पातळीवर असणारे यवत सबस्टेशन तर कधी “वरूनच “लोडशेडीग होत असते. परंतु अजूनही शेतकऱ्याला हे कळाले नाही की “वरून”म्हणजे नक्की कुठून. राहू बेट परिसरातील वडगाव, वाळकी आदी गावात तीन दिवसांमध्ये थ्री फेज फक्त दोन ते तीन तास वीज मिळत असेल तर शेतकऱ्यांनी नक्की काय करायचे हा मोठा प्रश्न आहे.

वीज चोरांमुळे अडचण
विजेची आधीच कमतरता असताना वीज चोरामुळे इमानदार खातेदारांना अडचण येत आहे. शंभर एचपीचा ट्रान्सफॉर्मर असेल त्यावर पाच एचपीचे वीस पंप असतील तर लोड बरोबर होते. परंतु अजून वीस बेकायदेशीर पंप असतील तर ट्रान्सफॉर्मरवर लोड येऊन तो जळतो. परंतु हे बेकायदेशीर पंपवाले मात्र कायदेशीर पंपधारकांना दमदाटी देऊन अडचणीत आणत आहेत, त्यांना काही प्रमाणात महावितरणचे कर्मचारी देखील सामील आहेत. त्यामुळे त्यांना आळा बसला तरी बराच प्रश्‍न सुरू शकतो.