“चुकीच्या धोरणांमुळे राज्‍यात शेतकरी आत्महत्या”

मुंबई – सततची नापिकी आणि कर्जबाजारीपणाला कंटाळून राज्यात गेल्या 2023 या वर्षातील 10 महिन्यात 2 हजार 478 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. हा मुद्दा हिवाळी अधिवेशनातही जोरदार गाजला. दरम्यान आज मंगळवारी विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंट ट्वीटरवर पोस्ट करत आश्वासनाच्या वाफा सोडणाऱ्या ट्रीपल इंजिन सरकारच शेतकरी आत्महत्येला जबाबदार असल्याचे म्हणत त्यांनी सरकारवर हल्लाबोल केला आहे.

राज्यात जानेवारी 2023 ते 31 ऑक्टोबर 2023 या कालावधीत झालेल्या शेतकरी आत्महत्येची माहिती समोर आली आहे. त्यानुसार, अमरावती विभागात 951, मराठवाडा विभागात 877, नागपूर विभागात 257, नाशिक विभागात 254 तर पुणे विभागात 27 शेतकऱ्यांनी आपली जीवनयात्रा संपवली आहे. याशिवाय लातूर जिल्ह्यात 64 आणि धुळे येथे 48 शेतकरी आत्महत्या झाल्या आहेत. तेव्हा राज्याला लागलेला शेतकरी आत्महत्येचा कलंक कधी पुसल्या जाणार असाही सवाल अधिवेशनातही उपस्थित करण्यात आला आहे. हाच धागा पकडत विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी सरकारवर हल्लाबोल केला आहे.

विजय वडेट्टीवार यांनी केलेल्या पोस्टमध्ये लिहिले आहे की, यवतमाळ जिल्ह्यातील पाच शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. दरदिवशी शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत आहे, ते फक्त सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे होत आहे.हिवाळी अधिवेशनासाठी सरकारचे तीन इंजिन विदर्भात येऊनही शेतकऱ्यांसाठी काही न करताच निघून गेले. राज्यात दरदिवशी होत असलेल्या शेतकरी आत्महत्यांसाठी मदतीच्या आश्वासनाचे वाफा सोडणारे ट्रीपल इंजिन सरकारच जबाबदार असल्‍याचा आरोप त्‍यांनी केला.

घोषणा हवेतच विरल्या – दानवे
सरकार सत्तेत आल्यापासून आत्महत्यामुक्त महाराष्ट्र करण्याच्या घोषणा करत आहेत. मात्र वाढत्या शेतकरी आत्महत्येच्या घटना पाहता सरकारने केलेल्या घोषणा या हवेत विरल्याची टीका विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केली. अवकाळी पावसाच्या नुकसान भरपाईची मदत अद्याप शेतकऱ्यांना मिळाली नाही. सरकारने जाहिरातीद्वारे प्रसिध्द केलेले आकडे हे कागदावरच राहिले आहेत. शेतकरी आत्महत्या, कुपोषण रोखण्यास हे सरकार अपयशी ठरल्याची टीकाही त्‍यांनी केली.