पुणे जिल्हा | भाटघरच्या स्थानिकांचा संसार पडला उघड्यावर

भाटघर, {दत्तात्रय बांदल} – भाटघरचे धरण बांधताना स्थानिकांची घरेदारे, जमिनी धरणात गेल्या. जमिनीच्या मोबदल्यात एकही रुपया मिळाला नाही. स्थानिकांचा संसार उघड्यावर पडला. यामुळे येथील स्थानिक नागरिक आर्थिकदृष्ट्या कमकुवत झाला. मात्र, भाटघरच्या पाण्यावर पूर्व भागात काही तालुक्यातील शेतकरी मालामाल झाला.

धरण बांधण्याअगोदर पूर्व भागात जिरायत क्षेत्र होते. परंतु धरण झाल्यानंतर पाण्यामुळे या शेतीला बागायतीचे स्वरूप प्राप्त झाले. तसेच या भागात उद्योगधंदा उभारणीलाही चांगलाच फायदा झाला. धरण बांधल्यामुळे स्थानिकांचा संसार उघडा पडला. परंतु पूर्व भागातील संसाराला उजाळा मिळाला.

भाटघरच्या पाण्यामुळे पूर्व भागात तीन जिल्ह्यातील हजारो हेक्टर क्षेत्र ओलिताखाली आले. यामुळे येथील जमिनीवर बागाईत फुलली. शेतकरी वर्गाला दरवर्षी लाखो रुपयांचे उत्पन्न मिळू लागले. भाटघरच्या पाण्यावर या भागातील शेतकरी मालामाल झाला.

मात्र, भाटघरचा रहिवासी भर उन्हात पिण्याच्या पाण्यासाठी वणवण भटकत आहे. भाटघरचे पाणी ज्या भागात जात आहे, त्या भागात भाटघरचा नागरिक पाहुणा म्हणून गेल्यास प्रथम पाहुण्यांच्या तब्येतीची विचारपूस न करता अगोदर भाटघर धरण भरले आहे का ? किंवा धरणात किती पाणी आहे ? असा प्रश्न विचारला जात आहे. यानंतर पाहुण्यांच्या परिवाराची व तब्येतीची विचारपूस होते.

भाटघरच्या पाण्यावर पूर्व भागातील राजकारण तापत आहे. या पाण्यामुळेच येथील शेतकऱ्यांची परिस्थिती बलाढ्य झाल्याने येथील राजकारण्यांचा आवाज वाढला आहे. नुकत्याच लोकसभेच्या झालेल्या निवडणुकीत विरोधकांना पाणी न देण्याचा दमही भरला जात होता. परंतु ज्या भाटघरच्या पाण्यावर आवाज चढला आहे. त्या भाटघरवासियांचा आवाज मात्र आर्थिक परिस्थिती कमकुवत असल्याने कमी झालेला दिसून येत आहे.

भाटघर परिसरात एका बाजूला धरण तर दुसऱ्या बाजूला डोंगर, अशी भौगोलिक परिस्थिती आहे. यामुळे स्थानिकांना शेतीसाठी अपुरी जमीन आहे. या भागात एमआयडीसी नसल्याने रोजंदारीचा गंभीर प्रश्न आहे. स्थानिकांनी आपल्या जमिनी शासनास दान केल्यामुळे भाटघर धरण बांधले गेले.

परंतु जमिनी कमी झाल्याने स्थानिक रहिवाशांची आर्थिक परिस्थिती मात्र कमकुवत झाली. भाटघरवासीयांमुळेच पूर्व भागातील हजारो हेक्टर जमीन ओलिताखाली आली. शासनाने याचा गांभीर्यपूर्वक विचार करून या भागात एमआयडीसी उभारणी करण्याची गरज आहे.

पाणलोट क्षेत्रात दुभत्या जनावरांचे हाल
भाटघरच्या पूर्व भागात कालव्याद्वारे पाणीपुरवठा होतो. तसेच नीरा नदीही वाहत असते. यामुळे येथील विहिरींना कोरडेपणाची जाणीव होत नाही. येथील शेतकरी बागाईत शेतीबरोबरच जोडधंदा म्हणून दुभत्या जनावरांचाही सांभाळ करीत आहे. परंतु भाटघर धरण पाणलोट क्षेत्रातील परिसरात मात्र, उन्हाळ्यात पिण्यासाठी पाणी उपलब्ध होत नसल्याने जनावरे पाळणे मुश्किल झाले आहे.