पिंपरी | मावळातील शेतकऱयांना प्रतीक्षा पावसाची

सोमाटणे, (वार्ताहर) – मावळ तालुक्यातील अनेक शेतकरी शेतीला जोडधंदा म्हणून दुग्ध व्यावसाय करतात. त्यांच्यासाठी लागणाऱया चाऱयाचे डोंगरदऱ्यातील क्षेत्र कमी होत असून जनावरांचे आजार, औषध आणि चाऱ्याच्या वाढत्या खर्चाने दुग्धउत्पादक शेतकऱ्यांसमोर अडचणी निर्माण झाल्या आहेत. त्यामुळे, त्यांना पावसाची प्रतीक्षा आहे.

मावळ तालुक्यात मोठ्या प्रमाणात पाऊस पडतो. पावसाळ्यात डोंगरदऱ्यात जनावरांसाठी मुबलक चारा मिळत असल्याने शेतकऱ्यांना दुग्ध व्यवसायातून चांगले उत्पन्न मिळते. मात्र, यावर्षी तापमानवाढीमुळे जनावरांच्या औषध व चाऱयाचा खर्च वाढला आहे. कडक उन्हामुळे गायी, म्हशींना चरण्यासाठी डोंगरदऱ्यात घेऊन जाणे कठीण झाले आहे.

त्यातच खुराक व चाऱ्याच्या किमतीही वाढल्या आहेत. परंतु, दुधाच्या दरात फारशी वाढ झाली नाही. त्यातच पावसाळा तोंडावर आला असून लवकर पावसाला सुरूवात झाल्यास शेतकऱ्यांच्या चाऱ्याचा खर्च वाचणार आहे. त्यामुळे, उत्पादन फायदेशीर होणार असल्याने त्यांना पावसाची प्रतीक्षा आहे.