Farmers Protest । ‘शेतकऱ्यांना दिल्लीला जायचे असेल तर त्यांनी बस, ट्रेन किंवा पायी जावे, आम्ही ट्रॅक्टरने जाऊ देणार नाही’

Farmers Protest ।  पंजाब आणि हरियाणातील शेतकरी आपल्या मागण्या घेऊन दिल्लीकडे मोर्चा काढण्याच्या तयारीत आहे. पंजाब आणि हरियाणाच्या शंभू सीमेवर शेतकऱ्यांचा ‘दिल्ली चलो’ मोर्चा थांबवण्यात आला आहे.

शेतकऱ्यांना रोखण्यासाठी आणि पांगवण्यासाठी पोलिसांनी मंगळवारी अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या. सिंघू बॉर्डर, टिकरी बॉर्डर आणि गाझीपूर बॉर्डरवर मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला.

या सीमांवर सिमेंट आणि लोखंडाचे बॅरिकेडिंगही करण्यात आले आहे. याशिवाय शेतकऱ्यांना रोखण्यासाठी काटेरी तारा आणि कंटेनरही ठेवण्यात आले आहेत. सकाळी पुन्हा दिल्लीत प्रवेश करण्याचा प्रयत्न करणार असल्याचे शेतकऱ्यांनी मंगळवारी सायंकाळी पुन्हा सांगितले. त्याचबरोबर शेतकऱ्यांवरील पोलिस कारवाईवरून विरोधी पक्षांनी सरकारवर निशाणा साधला आहे.

मंगळवारी आंदोलक शेतकऱ्यांनी शंभू सीमेवरील बॅरिकेड्स तोडण्याचा प्रयत्न केला आणि हरियाणा पोलिस कर्मचाऱ्यांवरही दगडफेक केली, त्याला प्रत्युत्तर म्हणून पोलिसांनी पाणी तोफ आणि अश्रुधुराचा वापर करून परिस्थिती नियंत्रणात आणली. हरियाणा पोलिसांच्या प्रवक्त्याने सांगितले की, ‘निदर्शनाच्या नावाखाली अशांतता पसरवण्यास परवानगी दिली जाणार नाही. शेतकऱ्यांना दिल्लीला जायचे असेल तर त्यांनी बस, ट्रेन किंवा पायी जावे, आम्ही त्यांना ट्रॅक्टरने दिल्लीला जाऊ देणार नाही.’