nagar | केबल चोरीचे प्रकार वाढल्याने शेतकरी हवालदील

निघोज (वार्ताहर) – पारनेर तालुक्यातील सांगवीसूर्या गावातील केबल चोरीचे प्रकार वाढल्याने शेतकरी हवालदील झाले आहेत. याबाबत लवकरात लवकर चोरांचा तपास न लागल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा माजी सरपंच संदीप रासकर यांनी दिला आहे.

गेली महिनाभरापासून सांगवीसूर्या गाव व परिसरातील शेतकऱ्यांच्या लाखो रुपयांची केबल चोरीस गेली आहे. मात्र पोलिसांकडे फिर्याद देऊनही अद्याप चोरांना पकडण्यासाठी पोलीस अपयशी ठरले आहेत. केबल चोरीचे प्रकार वाढल्याने शेतकऱ्यांपुढे दुहेरी संकट निर्माण झाले आहे. एकीकडे शेतीमालाला भाव नाही म्हणून शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे.

तशातच पाणी आहे मात्र वारंवार केबल चोरीचे प्रकार वाढल्याने शेतकरी हतबल झाला आहे. केबल चोरीचे प्रकार सातत्याने होत असल्याने शेतकऱ्यांनी केबल चोर पकडण्यासाठी सुरेश म्हस्के यांनी एक लाख रुपयांचे बक्षीस ठेवले आहे. ज्या व्यक्तीने केबल चोरट्यांचा संशय येईल, त्या व्यक्तीने पोलीसांना माहिती द्यावी त्यांचे नाव गुप्त ठेवण्यात येईल. केबल चोरीचा तपास न लागल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा माजी सरपंच संदीप रासकर यांनी दिला.