पुणे : आईने तक्रार मागे घेतली नाही म्हणून मुलावर जीवघेणा हल्ला

बेलदरे पेट्रोल पंपावरील थरार
पुणे –
एका तरुणाचा पाठलाग करत, त्याला जीवे ठार मारण्याचा प्रयत्न करण्यात आला. ही घटना आंबेगाव येथील बेलदरे पेट्रोल पंपामध्ये घडली. यावेळी पेट्रोल पंपावरील नागरिकांना कोयत्याचा धाक दाखवत दहशत पसरवून एका रिक्षाची काच फोडण्यात आली.

साहिल दत्तात्रय सनस (21,रा.टेल्को कॉलनी, दत्तनगर) यानी दिलेल्या फिर्यादीनूसार विशाल शेळके, लखन गायकवाड, रोहीत पाटेकर, सार्थक मिसाळ तसेच इतर दोन अनोळखी व्यक्तींविरुध्द खूनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

साहिल याच्या आईने पोलीस स्टेशनला यातील आरोपींविरुध्द एक तक्रार दाखल केली आहे. ही तक्रार मागे घ्यावी म्हणून आरोपींनी तगादा लावला होता. दरम्यान आरोपींनी कात्रज ते नवले ब्रीज दरम्यान साहिलचा पाठलाग केला. साहिलला आरोपी पाठलाग करत असल्याचे समजताच तो बेलदरे पेट्रोल पंपाच्या कार्यालयात घुसला.

यावेळी आरोपी लोखंडी रॉड घेऊन त्याच्या मागे आले. त्याला जीवे ठार मारण्याच्या उद्देशाने हल्ला केला. यानंतर पेट्रोलपंपावरील नागरिकांना कोयत्याचा धाक दाखवत जीवे ठार मारण्याची धमकी देत दहशत पसरवली. जाताना एका रिक्षाची काच फोडून नूकसान केले. याप्रकरणाचा तपास सहायक पोलीस निरीक्षक कवठेकर करत आहेत.

Leave a Comment