सातारा | धोम-बलकवडी कालव्यात पिता-पुत्र वाहून गेले

खंडाळा, (प्रतिनिधी) – असवली येथून जाणार्‍या धोम- बलकवडीच्या कालव्यात विक्रम पवार (वय 32) आणि त्यांचा मुलगा शंभूराज (वय 5, रा. अजनुज, ता. खंडाळा) हे दोघे रविवारी दुपारी 3 च्या सुमारास वाहून गेले. यातील शंभूराज हा आंबरवाडी परिसरात आढळून आला. त्याला खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, दुर्दैवाने उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. विक्रम पवार यांचा शोध अद्याप घेण्यात येत आहे.

याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, अजनुज येथील विक्रम पवार हे कुटुंबीयांसोबत रविवारी दुपारी असवली रस्त्यावर धोम-बलकवडी कालव्याच्या पाण्यात गोधड्या व इतर साहित्य धुवायला गेले होते. तेथे दुपारी 3 च्या सुमारास त्यांचा मुलगा शंभूराज हा मुलगा पाय घसरून पाण्यात पडला. हे पाहताच त्याला वाचवण्यासाठी विक्रम आणि त्यांचे वडील मधुकर पवार यांनी कालव्यात उडी घेतली.

अचानक घडलेल्या या घटनेने तेथे उपस्थित असलेल्यांची गाळण उडाली. पाण्याचा प्रवाह जास्त असल्याने तिघेही वाहून जाऊ लागले, त्यावेळी आजूबाजूला असलेली विक्रम पवार यांची पत्नी व स्थानिकांनी तिघांना वाचवण्यासाठी पाण्यात साडी टाकली. या प्रयत्नात मधुकर पवार यांना वाचवण्यात यश आले. मात्र, शंभूराज व विक्रम पवार हे वाहून गेले.

या घटनेची माहिती मिळताच स्थानिक तरुण, खंडाळा पोलीस आणि खंडाळा व शिरवळ रेस्क्यू टीमने शोधमोहीम राबवली. त्यात शंभूराज हा आंबरवाडी परिसरात कालव्यात आढळला. त्याला बाहेर काढून, मानसी मेमोरियल हॉस्पिटलमध्ये तात्काळ दाखल करण्यात आले. तेथे उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. शंभूराजच्या मृत्यूची माहिती कळताच परिसरावर शोककळा पसरली.

पोलीस निरीक्षक सुनील शेळके व कर्मचारी, तहसीलदार अजित पाटील, नायब तहसीलदार योगेश चंदनशिवे, मंडलाधिकारी संतोष नाबर, तलाठी भांगे, जोशी यांनी घटनास्थळी भेट दिली. विक्रम पवार यांचा शोध घेण्याची मोहीम रात्री उशिरापर्यंत सुरू होती. दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच खासदार श्रीनिवास पाटील यांनी अधिकार्‍यांना शोधमोहीम राबवण्याच्या आणि अशी घटना पुन्हा घडू नये यासाठी उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या.

प्रशासनाची तत्परता
या घटनेची माहिती कळताच सुट्टीच्या दिवशीही तहसीलदार अजित पाटील, पोलीस निरीक्षक सुनील शेळके, नायब तहसीलदार योगेश चंदनशिवे यांनी घटनास्थळी भेट देऊन, शोधमोहीम राबवली. अधिकार्‍यांच्या तत्परतेबद्दल नागरिकांनी धन्यवाद दिले.