अल कायदा पुन्हा डोके वर काढण्याची भीती; संयुक्त राष्ट्र संघटनेचा इशारा

काबुल – अफगाणिस्तानमध्ये गेल्या वर्षी तालिबान्यांची राजवट प्रस्थापित झाल्यानंतर तेथे अल-कायदाचे महत्त्व वाढू लागले आहे. त्यामुळे नजीकच्या कालावधीमध्ये अल-कायदा पुरस्कृत दहशतवादी घटनांत सुद्धा वाढ होण्याची शक्‍यता आहे, असा इशारा संयुक्त राष्ट्र संघटनेने जगातील सर्व देशांना दिला आहे.

अफगाणिस्तानच्या जमिनीचा वापर इतर कोणत्याही देशातील दहशतवादी संघटनेला करू दिला जाणार नाही अशी घोषणा तालिबान्यांनी केली असली तरी प्रत्यक्षात अफगाणिस्तानच्या भूमीवर अल कायदाचे अनेक दहशतवादी आश्रयाला आहेत. तालिबान्यांच्या राजवटीमध्ये अलकायदाचे अनेक दहशतवादी अफगाणिस्तानमध्ये मजेत राहत असून आपले अस्तित्व दाखवून देण्यासाठी लवकरच ते एखादा मोठा हल्ला करू शकतात, असे युनोचे म्हणणे आहे.

गेल्यावर्षी अफगाणिस्तानमधून अमेरिकेचे आणि नाटोचे सैन्य माघारी आल्यानंतर पुन्हा एकदा अफगाणिस्थान हा दहशतवाद्यांचा अड्डा बनू पाहात आहे. इसीस आणि अल कायदा या संघटनांचे दहशतवादी या देशांमध्ये कार्यरत आहेत. अफगाणी परराष्ट्र व्यवहार खात्याच्या मंत्र्यांशी अल कायदे संघटनेचे अनेक पदाधिकारी सतत संपर्कात असून त्यांच्यामध्ये कोणत्यातरी विषयावर चर्चा सुरू आहे.

अल कायदा संघटनेचा प्रमुख अल जवाहिरी सध्या जिवंत आहे की नाही याबाबत उलटसुलट बातम्या प्रसिद्ध होत आहेत. पण युनोच्या या माहितीप्रमाणे जवाहरी जिवंत असू शकतो आणि आपले अस्तित्व जगाला विशेषता अमेरिका दाखवून देण्यासाठी नजीकच्या कालावधीमध्ये एखाद्या मोठ्या हल्ल्याची योजना त्याच्या डोक्‍यात तयार असू शकते असा इशारा देण्यात आला आहे.