भारतीय चाहत्यांचे प्रेम पाहून नेमार भावुक; खास पोस्ट शेअर करत मानले आभार

तिरुअनंतपुरम – क्रिकेटवेड्या भारतात आता फुटबॉललाही प्रचंड चाहते लाभत आहेत. त्यातच कतारमध्ये झालेल्या फिफा विश्‍वकरंडक फुटबॉल स्पर्धेच्या पार्श्‍वभूमीवर केरळ तसेच महाराष्ट्रातील कोल्हापूरमध्येही चाहत्यांनी आपल्या आवडत्या खेळाडूंची पोस्टर्स झळकावत पाठिंबा दर्शवला. याच भारतीय चाहत्यांचे ब्राझीलचा सुपरस्टार नेमार व खुद्द जागतिक फुटबॉल संघटनेने (फिफा) आभार मानले आहेत.

BANvsIND | टीम इंडियाकडून बांगलादेशचा मोठा पराभव; कुलदीप यादवची चमकदार कामगिरी

तुमच्यासारख्यांच्या प्रेमामुळे येत्या काळात भारतातही फुटबॉल तळागाळापर्यंत पोहचेल, असा विश्‍वासही फिफाने व्यक्त केला. ब्राझीलचा अव्वल फुटबॉलपटू नेमारने भारतीय चाहत्यांचे आभार मानले आहेत. त्याने केरळमधील चाहत्यांना धन्यवाद दिले आहेत. यंदाच्या स्पर्धेत ब्राझीलला उपांत्यपूर्व फेरीत क्रोएशियाकडून पराभव स्वीकारावा लागल्याने त्यांचे आव्हान संपुष्टात आले. मात्र, तरीही त्यांच्या खेळाडूंनी भारतासह जगभरातील चाहत्यांचे आभार मानले आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by Neymar Jr Site (@neymarjrsiteoficial)

स्पर्धेदरम्यान केरळ व कोल्हापूरमधील चाहत्यांनी आपल्या आवडत्या संघांना तसेच खेळाडूंना पाठिंबा व्यक्त करताना राज्यभर तसेच शहरभर पोस्टर्स लावली होती. नेमारसह अर्जेंटिनाचा लिओनेल मेस्सी व पोर्तुगालचा ख्रिस्तियानो रोनाल्डो यांच्या पोस्टर्सने सोशल मीडियावर धुमाकूळ घातला होता. त्यामुळे नेमारच नव्हे तर खुद्द फिफानेही आपल्या इन्स्टाग्राम व ट्‌विटर हॅंडलवरून धन्यवाद दिले आहेत.