लढवय्या शब्बीर शेख! गंगाधाम येथील आग शमविताना असामान्य कर्तृत्व

संजय कडू

पुणे – वीस-बावीस दिवसांपूर्वीच अँजिओप्लास्टी झालीये…पुढच्या आठवड्यात पुन्हा हृदय शस्त्रक्रिया आहे. मधुमेह असल्यामुळे दोन्ही पाय सुजलेत.. अशा अवस्थेत अग्निशमन दलाचा एक जवान सकाळी पावणेनऊ वाजल्यापांसून आग नियंत्रणासाठी झटत होते. दोन्ही पाय सुजल्याने त्यांना हालचाल करताना अडचणी जाणवत होत्या. मात्र, त्याही अवस्थेत ते झगडत होते. त्यांना पाहून व्यापाऱ्यांनी आमच्यासाठी हाच “देव’ आहे अशी प्रतिक्रिया व्यक्त केली.

आगीची माहिती मिळताच गोडाऊन मालकांनी घटनास्थळी धाव घेतली होती. त्यांच्या डोळ्यांसमोर एक-एक गोडाऊन भक्षस्थानी पडत होता. आग नियंत्रणासाठी जवानही झटत होते. पाण्याचा मारा केल्यावर मोठ्या प्रमाणात धुराचे लोट पसरत होते. त्याही अवस्थेत आपल्या गोडाऊनची काय अवस्था झाली, हे पाहाण्यासाठी व्यापारी धडपडत होते. मात्र, प्रचंड धुरामुळे त्यांना गोडाऊनकडे जाता येत नव्हते. ज्यांनी प्रयत्न केला. पण, ते माघारी फिरले. मात्र, अग्निशमन दलाचे जवान पुढे जात कर्तव्य पार पाडत होते. जीवाची पर्वा न करता ते आगीवर नियंत्रण मिळविण्याचा प्रयत्न करत होते. यात सकाळी पहिल्या वर्दीला आलेले शब्बीर शेख सर्वांचे लक्ष वेधून घेत होते. सकाळी पावणेनऊ वाजल्यापासून त इतर सहकाऱ्यांसोबत ते कर्तव्यावर होते. दुपारपर्यंत त्याचे दोन्ही पाय सुजले होते. मात्र, त्यांची धडपड बंद झाली नव्हती.

त्यांची अवस्था पाहून काही व्यापाऱ्यांनी त्याला बाजूला घेत थोडा वेळ एका गोडाऊनमध्ये बसवले. त्यांना थोडा आराम करण्याचा सल्ला दिला. मात्र, त्यांनी तो न मानता सहकाऱ्यांना जशी गरज लागेल तशी धाव घेण्याचा प्रयत्न केला. शब्बीर शेख यांच्याबद्दल जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता, ते कोंढवा अग्निशमन केंद्रातील बंबावरील चालक असल्याचे समजले. त्यांनी तब्बल बारा वर्षे कात्रज केंद्रावर काम केले. यानंतर कोंढवा केंद्रावर रुजू झाले. पाच-सहा वर्षांपूर्वीच ते कायम सेवेत आले आहेत. आगीची पहिली वर्दी कोंढवा अग्निशमन केंद्राला आली. त्यानंतर ते लगेचच बंब घेऊन निघाले. दुपारपर्यंत धावपळ करुन त्यांचे दोन्ही पाय सुजले होते.

सहकारी म्हणतात…
“शब्बीर शेख यांची मागील महिन्यात ऍन्जिओप्लॅस्टी झाली आहे. तर, पुढच्या आठवड्यात पुन्हा हृदय शस्त्रक्रिया होणार आहे. त्यांना मधुमेह आहे. मात्र त्याही अवस्थेत ते कर्तव्यात कुठेही मागे राहिले नाहीत,” अशी भावना शेख यांच्या सहकाऱ्यांनी व्यक्‍त केली.

व्यापाऱ्यांकडून कृतज्ञता..
घटनास्थळावरील व्यापाऱ्यांनी “प्रभात’ला सांगितले, “आपण देव-म्हणतो. पण, तो कधी पाहिला नाही. मात्र, शब्बीर शेख यांना पाहून हाच आमचा देव असल्याचा भास झाला. आमचे गोडाऊन वाचवण्यासाठी त्यांची धडपड स्पृहनिय आहे. अनेक व्यापारी घटनास्थळाची परिस्थिती पाहून माघारी फिरले. पण, शेख मात्र त्रासाची कोणतीही तक्रार न करता लढत आहेत.’

आगीची वर्दी समजताच तेथे धावून जाणे हे माझे प्रथम कर्तव्य आहे. लोकांची मदत करण्याची माझी जबाबदारी आहे. सेवा बजावण्यापुढे माझ्या शारीरिक अडचणी किरकोळ आहेत, असे अग्निशमन केंद्र कोंढव्याचे बंबचालक शब्बीर शेख म्हणाले.

सर्वस्व खाक; व्यापारी भोवळ येऊन पडले

शैलैश शहा आणि विनोद शहा यांचे चारचाकी वाहनांच्या स्पेअर स्पार्टसचे “दर्शन मोटर्स’ गोडाऊन होते. आगीची माहिती मिळताच दोघांनीही घटनास्थळी धाव घेतली. पण, तोपर्यंत तेथील सर्व साहित्य खाक झाले होते. त्यांना अश्रू अनावर झाले होते. तर प्रगती ऑटोमोबाइलचे मालक प्रवीण जैन हे गोडाऊन खाक झाल्याचे पाहाताच भोवळ येऊन पडले. तीच अवस्था अशोक मंडप आणि डेकोरेटर्सचे अशोक शहा यांची झाली. तेही गोडाऊनची अवस्था पाहून जागेवरच कोसळले. त्यांना इतर व्यापाऱ्यांनी घरी पोहचवले.