अखेर पिंपरी चिंचवड पालिकेकडून चेंबरची दुरुस्ती…

चिखली – कुदळवाडी येथील मोरे पाटील चौक ते जाधववाडीकडे जाणाऱ्या मार्गावर चेंबर खचल्याने वाहनचालकांना अपघाताचा धोका निर्माण झाला होता. याबाबत दै. प्रभातने “कुदळवाडी येथे वाहनचालकांना अपघाताचा धोका’ या मथळ्याखाली वृत्त प्रसिद्ध करताच महापालिकेच्या ड्रेनेज विभागाने येथील चेंबरची दुरुस्ती केल्याने नागरिकांनी दै. प्रभातचे आभार मानले आहेत.

कुदळवाडीमधील मोरे पाटील चौक ते जाधववाडी आणि सेक्‍टर 16 ते चिखली मार्गावरील रिगल सोसायटीच्या जवळ मागील काही महिन्यांपासून सातत्याने चेंबरची झाकणे तुटत आहेत. परंतु महापालिकेचा ड्रेनेज विभाग तात्पुरती डागडुजी आणि कमी क्षमतेची झाकणे बसवित आहे. त्यामुळे अवजड वाहने येथून गेली की पुन्हा चेंबर खचून जातो आणि रस्ता वाहनचालक आणि नागरिकांसाठी धोकादायक बनत आहे.

कुदळवाडीत अनेक लहान मोठे लघु, सूक्ष्म उद्योग आणि भंगार व्यवसाय मोठ्या प्रमाणावर चालतो. त्यामुळे या परिसरात अवजड वाहतूक सुरू असते. त्या तुलनेत महापालिकेकडून ड्रेनेजलाइनची झाकणे सिमेंटची बसविण्यात येत असल्याने ती लवकर तुटून अपघात सदृश्‍य स्थिती निर्माण होत आहे. दोन दिवसांपूर्वी महापालिकेच्या वतीने ड्रेनेजलाइनवर दोन झाकणे बसविण्यात आली आहेत. परंतु लगेच त्या झाकणाची सिमेंट फ्रेमला तडे गेले आहेत. त्यामुळे महापालिकेचे असे काम चलावू काम वाहनचालकांच्या मुळावर येऊ शकते. त्यामुळे महापालिकेने या मार्गावरील सर्व चेंबरची झाकणे दर्जेदार बसवावित, अशी मागणी होत आहे.