अखेर प्रशासनाला आली जाग

सातारा  (प्रतिनिधी) – शासनाची परवानगी काढून उत्तर प्रदेशातून डांभेवाडी (ता. खटाव) येथे आलेल्या लोकांवर स्थानिकांचा आडमुठेपणा व प्रशासनाच्या मुर्दाडपणामुळे गावाबाहेर शेतात राहण्याची वेळ आली होती. याबाबत दैनिक “प्रभात’ने “मुर्दाड प्रशासन खेळतंय लोकांच्या जिवाशी’ या मथळ्याखाली वृत्त प्रसिद्ध केल्यानंतर प्रशासनाला खडबडून जाग आली. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी त्या लोकांची तातडीने भेट घेऊन गावातील एका शिवारात त्यांच्या राहण्याची सोय केली आहे.

याबाबत माहिती अशी, मूळचे डांभेवाडीचे रहिवासी असलेले आणि व्यवसायानिमित्त उत्तर प्रदेशात स्थायिक असलेले पाच जण दोन्ही राज्यांमधील कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून गुरुवारी (दि. 28 मे) गावात आले होते; परंतु काही टग्यांनी पोलिसांना हाताशी धरून त्यांना गावात येण्यास मज्जाव केला होता. या लोकांना गावाबाहेर एका शेतात उघड्यावर राहणे भाग पडले होते. गावातील काही लोकांनी याबाबत वडूजचे पोलीस निरीक्षक अशोक पाटील यांना माहिती दिली होती; परंतु पोलिसांनी गावात जाऊन पाहणी करण्याऐवजी टग्यांच्या सांगण्यावरून संबंधितांनाच फोनवरून धमकावल्याने ग्रामस्थांनी संताप व्यक्त केला होता. त्यांनी “प्रभात’च्या प्रतिनिधीला दूरध्वनीवरून ही घटना सांगितली. त्यावर, “प्रभात’ने वस्तुस्थितीदर्शक वृत्त प्रसिद्ध करून प्रशासनाचे कान टोचले होते. या वृत्ताची दखल प्रशासनाला घ्यावी लागली.

पोलीस निरीक्षक व महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांनी डांभेवाडीत जाऊन संबंधितांची भेट घेतली. या लोकांची गावात एका बाजूला राहण्याची व्यवस्था करण्याबाबत सूचना दिल्या. मात्र, पोलिसांच्या चुकीच्या मार्गदर्शनामुळे स्थानिकांनी आम्हाला गावात येण्यापासून रोखले असून आम्ही शेतातच राहणार, असा पवित्र या लोकांनी घेतला. त्यांनी पोलीस निरीक्षक पाटील यांना धारेवर धरले. त्यानंतर काही नागरिकांनी मध्यस्थी करून संबंधितांची समजूत काढली. गावाबाहेरील एका ठिकाणी राहण्याच्या विनंतीला मान देत संबंधितांनी शेतातून उठण्यास होकार दिला. त्यानंतर त्यांची सोय एका शेडमध्ये करण्यात आली आहे.

Leave a Comment