अखेर ‘शिवशाही’चा प्रवास थांबला; खासगी ठेकेदारांशी एसटी महामंडळाची मुदत संपली

पुणे -खासगी ट्रॅव्हल्सला तोडीस तोड सेवा देण्यासाठी एसटी महामंडळाने “शिवशाही’ नावाने मुख्य मार्गांवर वातानुकूलित बस सेवा सुरू केली होती. यासाठी ठेकेदारांशी केलेला करार दि.30 जून रोजी संपल्याने या बस परत गेल्या आहेत. महत्त्वाचे म्हणजे, उत्तम आणि दर्जेदार सेवेपेक्षा सतत अपघात आणि गैरसोयींनी ही बस चर्चेत राहिली.

लांब पल्ल्याच्या मार्गांवर एसटी महामंडळाने दि. 1 जुलै 2017 रोजी शिवशाही बससेवा सुरू केली होती. त्यासाठी राज्य-परराज्यातील खासगी कंपनीकडून बस घेण्यात आल्या. शिवशाही बसेसना एसटीकडून प्रतिकिमी 29 रुपये शुल्क दिले जायचे. त्याशिवाय डीझेल पुरवठा आणि वाहक एसटीचा असायचा. बसची देखभाल-दुरुस्ती, स्वच्छता व चालक ही जबाबदारी संबंधित कंपनीची होती. यात पुणे विभागातून 63 बस धावायच्या. सुरुवातीला या बसला चांगला प्रतिसाद मिळायचा. पण, कालांतराने बस रस्त्यातच नादुरुस्त होणे, टायर फुटणे, चालकाचे गैरवर्तन, अपघातांचे सत्र, बसची अस्वच्छता, ए.सी. बंद असणे यामुळे प्रवाशांचा प्रतिसाद मिळणे कमी झाले. त्यानंतर एस.टी. महामंडळाने या बसेसचे भाडे कमी केले होते. पण, तरीदेखील ही बस तोट्यातच धावत होती.

करोनानंतर करारास वाढ
महामंडळाने भाड्यात कपात करत प्रवाशांना आपल्याकडे ओढण्याचा प्रयत्न केला. पण, प्रवाशांचा प्रतिसाद फारसा मिळाला नाही. सन 2021 मध्ये या ठेकेदार कंपन्यांना मुदतवाढ देण्यात आली. विशेषत: पुणे, मुंबई, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, सोलापूर, नांदेड, नागपूर मार्गांवर शिवशाही बस सेवा सुरू होती.

आता साध्या बस धावणार
गेल्या महिनाभरात ठेकेदार कंपनीने 100 बसेस टप्प्याटप्प्याने एसटीच्या सेवेतून कमी केल्या होत्या. आता दि. 1 जुलैपासून शिवशाहीची सेवा पूर्णत: बंद केली आहे. ज्या मार्गावर शिवशाही बस धावत्या होत्या. त्या मार्गावर एसटीच्या साध्या बस धावणार आहेत.