अखेर योगी सरकारला आली जाग; लखनौमध्ये उभारणार एक हजार बेडचे तात्पुरतं रुग्णालय

लखनौ  – करोना स्थिती हाताळण्याची सर्वाधिक दुर्दशा उत्तर प्रदेशात दिसून आली असून हे सरकार आतापर्यंत तेथील रुग्णांची संख्या दडवत होते आता ते तेथील करोनामुळे होणाऱ्या मृत्यूचेही आकडे झाकण्याचा कसोशीचा प्रयत्न करीत असल्याची टीका उत्तर प्रदेश सरकारवर सुरू आहे. राजधानी लखनौमध्ये करोनाने कहर चालवला असून या पार्श्‍वभूमीवर आता तेथील सरकारला काहीशी जाग आली असून आता त्यांनी लखनौमध्ये एक हजार बेडचे तात्पुरते रुग्णालय उभारण्याचे काम हाती घेतले आहे. गेल्या 24 तासांत उत्तर प्रदेशात 22 हजार 439 नवीन करोना रुग्णांची भर पडली असून प्रत्यक्षातला हा आकडा त्याहूनही बराच अधिक असल्याची शक्यता आहे.

या रुग्णालयासाठी जागा शोधण्याचा व वैद्यकीय सामग्री उपलब्ध करण्याच्या संबंधात पाहणी करण्याचा आदेश प्रशासनातील अधिकाऱ्यांना देण्यात आला आहे. डिफेन्स एक्‍स्पो ज्या मैदानावर भरवले जाते ती जागा यासाठी योग्य राहील, असे मुख्यमंत्री योगींनी सुचवले आहे असे एका सरकारी प्रवक्‍त्याने आज सांगितले. या रुग्णालयाला जोडूनच एक नियंत्रणकक्षही स्थापन केला जाणार आहे. लोकांची मागणी लक्षात घेऊन पुढील एक महिना पुरेल इतके रेमडेसिवीर औषध खरेदी करण्याची सूचना सरकारने प्रशासनाला केली आहे. रुग्णवाहिकाही पुरेशा प्रमाणात उपलब्ध असतील याची दक्षता घ्या, अशी सूचनाही मुख्यमंत्र्यांनी केली आहे असे त्यांच्या प्रवक्‍त्याने सांगितले. आता प्रत्येक जिल्हा प्रशासनाला करोना टेसिंटगचीही पुरेशी व्यवस्था करण्याचा आदेश देण्यात आला आहे. खासगी वैद्यकीय प्रयोगशाळांसाठीही करोना टेसिंटगचे दर सरकारने निश्‍चित केले असून त्यापेक्षा जास्त दर घेण्यावर कारवाई केली जाईल, अशी तंबी देण्यात आली आहे. प्रत्येक जिल्ह्यात नियंत्रण कक्ष उभारून या स्थितीवर लक्ष ठेवण्याचा आदेशही मुख्यमंत्री कार्यालयातून जारी करण्यात आला आहे.

Leave a Comment