‘वारसा संपत्तीवर कर….’, अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांची काँग्रेस पक्षावर जोरदार टीका

नवी दिल्ली  – अर्थमंत्री निर्मला सीतारामन ( Finance Minister Nirmala Sitharaman) यांनी काँग्रेस पक्षाच्या कथित वारसा संपत्तीवर कर म्हणजे इन्हेरीटन्स टॅक्स या संकल्पनेवर जोरदार टीका केली. त्यामुळे मध्यमवर्गीय आणि नव्याने श्रीमंत होऊ इच्छिणार्‍या लोकांवर सर्वात जास्त परिणाम होणार आहे. कारण या लोकांना आपली संपत्ती आपल्या मुलांना देता येणार नाही.

काँग्रेस पक्षाच्या या कथीत संकल्पनेवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी छत्तीसगडमधील निवडणूक सभेत जोरदार टीका केली होती. निर्मला सीतारामन यांनी पंतप्रधानांचे भाषण सोशल मीडियावर टाकले आहे. त्याचबरोबर त्यावर आपले मत नोंदविले आहे. सितारामन या सोशल मीडियावरील आपल्या वक्तव्यात म्हणतात की, काँग्रेस पुन्हा सत्तेवर आल्यास नागरिकांची संघटितपणे लूट करण्याची शक्यता आहे.

त्यामुळे काँग्रेसला सत्तेपासून दूर ठेवण्याची गरज आहे. सितारामन यांनी सांगितले की, नागरिक जिवंत असताना त्यांच्यावर कर लावला जातो आणि निधन झाल्यानंतरही त्यांच्यावर कर लावण्याचा काँग्रेसचा डाव आहे. त्यामुळे मध्यमवर्गीय आणि नव्याने श्रीमंत होणारे लोक नाराज होतील. कारण त्यांना आपली बचत किंवा आपली संपत्ती आपल्या मुलांना देता येणार नाही.

काँग्रेसच्या या संदर्भातील वक्तव्याची दखल माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनीही घेण्याची गरज असल्याचे सितारामन यांनी आपल्या समाज माध्यमावरील पोस्टमध्ये म्हटले आहे. वारश्यातील संपत्तीवर कर लावण्याची संकल्पना इंडियन ओव्हरसीज काँग्रेसचे अध्यक्ष सॅम पित्रोदा यांनी मांडली होती. त्यांनी फक्त चचसाठी हा प्रस्ताव पुढे केला होता. मात्र या मुद्याचे राजकारण केले जात आहे असे काँग्रेसने म्हटले आहे. काँग्रेस पित्रोदा यांच्या या मताशी सहमत नसल्याचे काँग्रेसने अगोदरच स्पष्ट केले.

छत्तीसगड येथे बोलताना नरेंद्र मोदी यांनीही पित्रोदा यांचे नाव न घेता या विषयावर मत व्यक्त केले. ते म्हणाले की, नागरिक जिवंत असताना त्यांच्याकडून कर घेतला जातो आणि नागरिकाचे निधन झाल्यानंतरही त्याच्या संपत्तीवर कर लावण्याचा काँग्रेसचा डाव आहे.
यावर नंतर पित्रोदा यांनीही मत व्यक्त केले आहे.

ते म्हणाले की मी टेलिव्हिजन वरील चर्चेत बोलताना अमेरिकेमध्ये कशाप्रकारे वारसा संपत्तीवरील कर लावला जातो. अशा प्रकारच्या विषयावर आपण चर्चा करण्याची गरज आहे असे म्हटले होते. मात्र भारतीय जनता पक्षाकडून माझ्या वक्तव्याचा निवडणुकीसाठी वापर केला जात आहे. ही खेदाची बाब आहे. अशा विषयावर रचनात्मक चर्चा करण्याऐवजी त्याचा राजकारणासाठी वापर केला जातो हे दुर्दैव आहे असे पित्रोदा यांनी म्हटले आहे