विमानात सिगारेट ओढल्याचा दंड 25 हजार, आरोपी म्हणाला.. 250 मध्ये मिटवा; पाठवले कारावासात

नवी दिल्ली – एअर इंडियाच्या विमानात सिगारेट ओढणे आणि गैरवर्तन केल्याप्रकरणी एका व्यक्तीला न्यायालयाने तुरुंगात पाठवले आहे. या प्रकरणी कोर्टाने आरोपीला 25,000 रुपये दंड ठोठावला होता. पण आरोपी फक्त 250 रुपये जमा करण्यावर ठाम होता. त्यावर न्यायालयाने आरोपीला तुरुंगात पाठवले आहे. रत्नाकर द्विवेदी असे आरोपीचे नाव असून त्याच्यावर एअर इंडियाच्या लंडन-मुंबई फ्लाइटमध्ये सिगारेट ओढणे आणि गैरवर्तन केल्याचा आरोप आहे.

पोलिसांनी आरोपीविरुद्ध भादंवि कलम 336 अन्वये गुन्हा दाखल केला होता. आरोपीला न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने त्याला 25 हजार रुपयांचा दंड ठोठावला. यावर आरोपीने न्यायालयाला सांगितले की, आयपीसी कलम अन्वये 250 रुपयांचा दंड ठोठावण्यात आल्याचे त्याने ऑनलाइन वाचले होते. अशा स्थितीत आरोपीने 250 रुपये दंड भरण्याची तयारी दर्शवली मात्र न्यायालयाने ती फेटाळून लावत आरोपींची तुरुंगात रवानगी केली.

एअर इंडियाने एक निवेदन जारी केले होते की, प्रवाशाने फ्लाइटमध्ये सिगारेट ओढली आणि इतर लोकांशी गैरवर्तन केले आणि संतप्त वृत्ती स्वीकारली. यावर विमानाच्या पायलटने प्रवाशाला समजावण्याचा प्रयत्न केला, मात्र आरोपींनी वैमानिकाचे ऐकले नाही. त्यावरून पोलिसांनी आरोपींविरुद्ध प्रवाशांचा जीव धोक्‍यात घालून गुन्हा दाखल केला.