टाटा स्टील कारखान्यात स्फोटानंतर आगीचे तांडव

जमशेदपूर – झारखंडमधील जमशेदपूरस्थित टाटा स्टील कारखान्यात शनिवारी जोरदार स्फोट होऊन आगडोंब उसळला. त्या दुर्घटनेत तीन कामगार किरकोळ जखमी झाले.

टाटा स्टील कारखान्यात सकाळी 10 वाजून 20 मिनिटांनी अचानक स्फोट झाला. वायूवाहिनीत तो स्फोट झाल्याची माहिती नंतर देण्यात आली. स्फोटानंतर कारखान्याच्या काही भागात आग पसरली. त्या दुर्घटनेनंतर तातडीने मदत आणि बचाव कार्य हाती घेण्यात आले. अग्निशमन बंबांनी शर्थीचे प्रयत्न करून अल्पावधीत आगीवर नियंत्रण मिळवले.

दुर्घटनेवेळी कारखान्यात असलेल्या कामगारांना तातडीने सुरक्षित स्थळी हलवण्यात आले. स्फोटाच्या नेमक्‍या कारणाचा शोध घेण्यासाठी पुढील तपास केला जात आहे. झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी दुर्घटनेची माहिती घेऊन स्थानिक प्रशासनाला आवश्‍यक ती पाऊले उचलण्याच्या सूचना दिल्या.