शेतकरी कर्जमाफीची पहिली यादी उद्या जाहीर होणार

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज सह्याद्री अतिथीगृह येथे अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पूर्व संध्येला पत्रकार परिषद घेतली. विरोधकांनी सरकारवर आरोप करण्यापेक्षा समजूतदारपणे विरोधकांनी आपली भूमिका पार पाडावी, असा सल्ला त्यांनी विरोधकांना दिला.

“मला अशी अपेक्षा आहे की विरोधी पक्षाने एका समर्थ विरोधी पक्षाची भूमिका बजावायला पाहिजे. विरोधी पक्ष आहे म्हणून सरकारवर वारेमाप आरोप केले म्हणजे विरोधी पक्षाची भूमिका आपण पार पाडली हे योग्य नाही. जे काही सरकार चांगलं करतं, त्या चांगल्याला मुक्तपणे चांगलं म्हणणं हे सुद्धा एका चांगल्या विरोधी पक्षाचे लक्षण आहे”असे मुख्यमंत्री म्हणाले.

“विरोधी पक्षाच्या काही सूचना असतील किंवा काही व्यथा असतील तर जरूर मांडाव्या. पण सरकार चांगलं काम करत असताना जणु हे सरकार काही करतच नाही ही भूमिका अयोग्य आहे.” असे मत त्यांनी मांडले.

“गेल्या काही दिवसांत सरकारने जे चांगले निर्णय घेतले ते चांगले निर्णय आम्ही जवळपास सर्व क्षेत्रातील सर्व घटकांतील जनतेला सरकार म्हणून आधार देऊ शकू त्या अनुषंगाने घेतले आहेत.” “जी घोषणा आम्ही आमच्या पहिल्या अधिवेशनात केली होती की, शेतकऱ्यांना ज्यांच पीक कर्ज २ लाखांपर्यंतचे आहे त्यांना आम्ही कर्जमुक्त करू त्याची पहिली यादी आम्ही उद्या जाहीर करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

“उद्या कर्जमुक्तीची जी यादी येईल, ती यादी जाहीर झाल्यानंतर ती पूर्ण करून आम्ही पुढे जाणार आहोत. मार्च, एप्रिल, मे या तीन महिन्यांमध्ये ही योजना पूर्ण होईल.” असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. “शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीबद्दल पहिली यादी उद्या जाहीर होईल. दुसरी यादी २८ फेब्रुवारीला जाहीर करण्यात येईल. अशी माहिती त्यांनी दिली.

“शिवभोजन योजना सुरू केलेली आहे, त्यावर टीका केली गेली. एकूणच स्वतः काही करायचं नाही आणि हे सरकार काही चांगल करत असेल तर ते अयोग्य कसं हे दाखवण्याचा प्रयत्न विरोधक करीत असल्याची टीका त्यांनी केली.

“महिलांवर कोणत्याही प्रमाणात अत्याचार वाढता कामा नये, उलट हे अत्याचार पूर्ण बंद झाले पाहिजेत. त्यादृष्टीने हे सरकार पावले टाकत असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. “आजच बैठक होती ती गिरणी कामगारांच्या घरांसाठी. त्याची पहिली लॉटरी एक  मार्च रोजी निघणार आहे. त्यानंतर सुद्धा जितके गिरणी कामगार आहेत त्यांना जे आमचे वचन होते की गिरणी कामगारांना घरे, ती योजना सुद्धा हे सरकार प्रभावीपणे राबवत आहे आणि त्या सर्व गिरणी कामगारांना हे सरकार घरे देईल.”

“एक गोष्ट विरोधी पक्षाला मानावी लागेल की महाराष्ट्रामध्ये कुठेही दंगे झालेले नाहीत, पण जिथे त्यांचे सरकार आहे, तिथे दंगे झालेले आहेत.”असल्याचे ते म्हणाले. “मराठा समाजाबद्दल कोर्टात जी लढाई आहे ती पूर्ण ताकदीनिशी राज्य सरकार लढत आहे. सरकार ही न्यायाची लढाई सरकार जिंकल्याशिवाय राहणार नाही.” असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

 

Leave a Comment