अखेर प्रतीक्षा संपली ! नवी मुंबईत धावली पहिली मेट्रो..

नवी मुंबई – नवी मुंबईकरांना (Navi Mumbai) बऱ्याच वर्षांपासून प्रतीक्षा असलेली मेट्रो सेवा अखेर सुरु झाली. कोणत्याही प्रकारचे उद्‌घाटन न करता मेट्रो सेवा सुरु करण्याचे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी दिले होते. त्यानुसार आज बेलापूर ते पेंधार स्थानकादरम्यान पहिली मेट्रो धावली.

यावेळी सिडकोचे जॉईंट एमडी कैलाश शिंदे, नवी मुंबई महानगर पालिका आयुक्त राजेश नार्वेकर उपस्थित होते. मागील अनेक वर्षांपासून नवी मुंबईकर या मेट्रोची वाट पाहत होते. नवी मुंबईच्या अंतर्गत भागामध्ये ही मेट्रो धावणार आहे. (Mumbai Metro)

याचा सर्वाधिक लाभ हा तळोजा भागात राहणाऱ्या लोकांना होणार असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे आता नवी मुंबईकरांना दिवाळीची भेट मिळाली असून आता सुखकर प्रवास करण्यात प्रवाशांना सोपं होणार आहे.(navi Mumbai News)

दरम्यान, 1 मे 2011 रोजी नवी मुंबई मेट्रोचे भूमिपूजन तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण (Prithviraj Chavhan) यांनी केले होते. तेव्हापासून या मेट्रोचा तिढा काही केल्या सुटत नव्हता. परंतु सिडकोच्या नवी मुंबई मेट्रो प्रकल्पातील मार्ग क्र.1 वरील सेंट्रल पार्क ते बेलापूर स्थानक या स्थानकांदरम्यान प्रवासी वाहतूक सुरू करण्याकरिता मेट्रो रेल्वे सुरक्षा आयुक्तांनी परवानगी दिली होती. पण त्यानंतरही ही मेट्रो सुरु होण्याकरिता काही केल्या मुहूर्त लागत नव्हता.