‘आदित्य एल १’ ची पहिली प्रक्रिया यशस्वी; ‘इस्रो’ने ट्विट करत दिली महत्वाची माहिती

नवी दिल्ली : देशाच्या पहिल्या महत्वकांक्षी सौर मोहिमेतील ‘आदित्य एल १’ उपग्रहाची पृथ्वीच्या कक्षेशी संबंधित पहिली प्रक्रिया यशस्वीरित्या पूर्ण झाली, असे इस्रोने जाहीर केले. ही प्रक्रिया येथे असलेल्या ‘इस्रो टेलिमेट्री, ट्रॅकिंग आणि कमांड नेटवर्क’द्वारे पार पडली असून हा उपग्रह अगदी सुस्थितीत असून योग्यरित्या काम करत असल्याचेही ‘इस्रो’ने स्पष्ट केले आहे.

‘इस्रो’ने  ट्विट करत याविषयी माहिती दिली आहे. आपल्या ट्विटमध्ये,’कक्षेसंबंधित पुढील प्रक्रिया ५ सप्टेंबर २०२३ रोजी भारतीय स्थानिक वेळेनुसार पहाटे तीन वाजता नियोजित केली आहे. पहिली पृथ्वी कक्षा परिभ्रमण मोहीम (ईबीएन#1) बंगळुरूच्या ‘आयएसटीआरएसी’येथून यशस्वीरित्या पार पडली. या उपग्रहाने प्राप्त केलेली नवीन कक्षा २४५ किलोमीटर ७ २२,४५९ किमी आहे.असे सांगण्यात आले आहे.

दरम्यान, ‘आदित्य एल १’चे शनिवारी आंध्र प्रदेशच्या श्रीहरिकोटा येथून यशस्वी प्रक्षेपण करण्यात आले आहे. ‘आदित्य-एल १’ ही अवकाशीय सौर वेधशाळा असून, ती सूर्याच्या बाह्य वातावरणाचा अभ्यास करणार आहे. हा उपग्रह सूर्यावर उतरणार नाही किंवा त्याच्या जवळही जाणार नाही.

सूर्य आणि पृथ्वी यांच्यातील गुरुत्वाकर्षण समतोल बिंदूंपैकी एक बिंदू- ‘लँगरेंज पॉइंट १’ (एल-१) वर हे यान प्रस्थापित करण्यात येईल. पृथ्वीपासून तिथपर्यंत सुमारे १५ लाख किलोमीटर अंतरावर सूर्याच्या दिशेने हे यान १२५ दिवसांनी पोहोचणार आहे. हे अंतर पृथ्वी-सूर्यातील एकूण अंतराच्या सुमारे एक टक्केच असले तरीही ‘एल-१’ हा सूर्याच्या तुलनेने सर्वात जवळचा बिंदू मानला जातो.