फिटनेस : जीवन जगण्याची कला

भगवद्‌गीतेमध्ये दुसऱ्या अध्यायमध्ये भगवान श्रीकृष्ण यांनी योगाची एक उत्तम परिभाषा दिली आहे. “समत्वं योग उच्चते’ म्हणजेच परस्पर विरुद्ध घटकांना सारखेपणाने सांभाळणे म्हणजेच योग होय. याचा अर्थ माणसाने सुख-दुःख, यश-अपयश, भय-शोक अशा परस्परविरुद्ध भावनांना सारखेपणाने (समान) हाताळण्याची कला अवगत करण्यासाठी योग अभ्यास जरुरीचे आहे.

योग हे एक अति प्राचीन शास्त्र आहे. योग ह्या शब्दाचा अर्थ आहे जोडणे असा आहे. आपल्या रोजच्या व्यवहारात कुठलीही गोष्ट जी जोडतो किंवा ज्यांचा संयोग करतो त्यालाच योग असे म्हणतो. योग शास्त्रात शरीर आणि मन ह्यांचा संयोग होतो. प्राचीन घेरंडसंहितेनुसार योगामुळे तुम्हाला उत्कृष्ट बलप्रप्ती होते.

योगाचा मुख्य उद्देश्‍य मानसिक आणि शारीरिक क्रियांवर तसेच हालचालींवर उचित नियंत्रण आणणे हा होय.
योग हा शरीर, श्वास आणि मन यांना जोडणारा सराव आहे. हे एकूण आरोग्य सुधारण्यासाठी शारीरिक मुद्रा, श्वासोच्छवासाचे व्यायाम आणि ध्यान यांचा वापर करते. योग हा हजारो वर्षांपूर्वी अध्यात्मिक साधना म्हणून विकसित झाला होता. आज, बहुतेक पाश्‍चिमात्य लोक जे योगा करतात ते व्यायामासाठी किंवा तणाव कमी करण्यासाठी करतात.

योगाचे प्रकार
तसे योगाचे अनेक प्रकार आहेत. राजयोग, हठयोग, तसेच गीतेमध्ये सांगितल्याप्रमाणे कर्मयोग म्हणजेच जन्मापासून मृत्यूपर्यंत आपापली कर्तव्ये निष्ठेने पार पाडणे. भक्ती योग म्हणजे ईश्वराचे श्रवण, कीर्तन, स्मरण, वंदन, अर्चना करणे. ज्ञानयोग म्हणजे आपण कोण आहोत आणि आपण काय अनुभवत आहोत, या सत्याचा शोध म्हणजेच स्वतःचा शोध घेणे. पण सध्याच्या जीवन शैलीत आज काल हठयोगाभ्यास ही सर्वात लोकप्रिय शैलींपैकी एक आहे. हा प्रकार स्थिर, ध्यानात्मक प्रकारापेक्षा अधिक शारीरिक प्रधान योग आहे. श्वासावर लक्ष केंद्रित करण्यापासून सुरुवात होऊन यानंतर आसनांची (योग मुद्रा) मालिका केली जाते. ह्या आसनांमध्येसुद्धा विविध प्रकार असून उभे राहून, बसून, आणि झोपून करायची विविध आसने सांगितली आहेत.

योगाचे फायदे
योगामुळे तुमची लवचिकता वाढते.
योगामुळे तुमच्यात शक्ती निर्माण होण्यास मदत होते.
योगामुळे तुमची शारीरिक व मानसिक स्थिती सुधारते.
योगामुळे तुमचे सांधे निरोगी राहण्यास मदत होते.
योगमुळे तुमची जागरूकता वाढते.
योगामुळे तणाव कमी होतो.
योगामुळे रक्तदाब कमी होतो.
योग तुम्हाला निरोगी जीवन जगण्यास मदत करतो.
मेंदूचे कार्य सुधारते.
तुमच्या फुफ्फुसची क्षमता वाढते.