जळगावमधील भीषण अपघातात पाच जण ठार

जळगाव – जळगाव जिल्ह्यातील फैजपूर येथे झालेल्या भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू झाला असून अन्य सहा जण गंभीर जखमी झाले आहेत. हा अपघात नशिराबाद (ता. जि. जळगाव) येथील महामार्गावरील उड्डाणपुलावर बुधवारी सकाळी साडेसात वाजेच्या सुमारास घडला.

याबाबत अधिक माहिती अशी की, नशिराबाद (ता. जि. जळगाव) येथून बकऱ्या भरून मालवाहू मोटार यावल तालुक्‍यातील फैजपूर येथे बुधवारी भरणाऱ्या बाजारात जात होते. दरम्यान, राष्ट्रीय महामार्गावरील नशिराबादजवळील टोल नाक्‍याच्या पुढे असणाऱ्या उड्डाणपुलाजवळ समोरून भुसावळकडून विरुद्ध बाजूने भरधाव येणाऱ्या मालमोटारीने मालवाहू मोटारीला जोरदार धडक दिली. यानंतर मालमोटार अजून एका मोटारीला धडकली. या भीषण तिहेरी अपघातात पाच जण ठार, तर सहा जण जखमी झाले आहेत.

जखमींवर डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयात उपचार सुरू आहेत. हा अपघात आज सकाळी साडेसात वाजेच्या सुमारास घडला.

अपघाताची माहिती मिळताच नशिराबाद पोलीस ठाण्याचे सहाय्यक निरीक्षक अनिल मोरे, उपनिरीक्षक राजेंद्र साळुंखे, अमोल साळवे, किरण बाविस्कर, रवींद्र इंधाटे, अतुल महाजन यांच्यासह कर्मचाऱ्यांनी, तसेच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेऊन मदतकार्य सुरू केले. अद्याप मृत झालेल्यांची ओळख पटलेली नव्हती.