जातीच्या खोट्या सर्टिफिकेट आधारे पाच खासदार, नवनीत राणांचाही समावेश; मांझी यांचा आरोप

नवी दिल्ली  – देशातले किमान पाच खासदार जातीच्या खोट्या प्रमाणपत्राच्या आधारे संसदेत निवडून गेले आहेत. त्यात एक केंद्रीय मंत्रीही आहे असा आरोप बिहारचे माजी मुख्यमंत्री जीतनराम मांझी यांनी केला आहे. आज येथे पत्रकारांशी बोलताना त्यांनी हा आरोप केला.

हे पाच खासदार कोण आहेत त्यांची नावेही त्यांनी सांगितली. ते म्हणाले की केंद्रीय मंत्री एस. पी. सिंह बघेल, जयसिद्धेश्‍वर शिवाचार्य महास्वामी (दोघेही भाजप), कॉंग्रेस खासदार मोहंमद सिद्दीकी, तृणमूल खासदार अपरूपा पोतद्दार आणि अपक्ष खासदार नवनीत राणा अशी त्यांची नावे आहेत.

ते म्हणाले की, देशातील दलितांसाठी सरकारी नोकऱ्यांमध्ये ज्या जागा राखीव आहेत त्यातील किमान पंधरा ते वीस टक्के जागा अन्य जातीच्या लोकांनी खोटी प्रमाणपत्रे देऊन बळकावल्या आहेत. दलितांसाठी स्वतंत्र मतदार याद्या तयार करण्याची मागणीही त्यांनी केली.

जीतनराम मांझी हे त्यांनीच स्थापन केलेल्या हिंदुस्तान अवामी मोर्चा या पक्षाचे अध्यक्ष आहेत. त्यांनी पक्षाची कार्यकारिणी बरखास्त करण्यात आल्याची घोषणाही यावेळी केली. पक्षाची नवीन कार्यकारिणी लवकरच जाहीर केली जाईल, अशी घोषणाही त्यांनी केली आहे.

दरम्यान, काश्‍मिरात शांतता प्रस्थापित करण्याचे प्रयत्न केंद्र सरकारकडून सुरू असले तरी त्यात त्यांना यश आलेले नाही. तेथे गरीब मजुरांच्या हत्या सुरू आहेत ही दुर्दैवी घटना आहे असे त्यांनी म्हटले आहे.