करोना संशयितांना फाईव्ह स्टार पाहूणचार

पालिका प्रशासन 24 तास निरीक्षणाखाली ठेवणार


विलगीकरण कक्षात हॉटेलच्या धर्तीवर सुविधा

पुणे – परदेशातून शहरात परतलेल्या नागरिकांना करोनाची लक्षणे नसली तरी 24 तास निरीक्षणाखाली ठेवण्यात येणार आहे. त्यासाठी महापालिकेकडून सणस मैदान येथील क्रीडा वसतिगृह तसेच सिंहगड रस्त्यावरील लायगुडे दवाखान्यात विलगीकरण कक्ष उभारले असून येथे पंचतारांकीत हॉटेलच्या धर्तीवर रुग्णांना सुविधा देण्यात येणार आहेत. या सुविधांमध्ये दैनंदिन वापराच्या साहित्यापासून मनोरंजनासाठी प्रत्येक खोलीत टीव्ही असणार असल्याची माहिती प्रशासनाने दिली.

शहरात गेल्या आठवड्याभरात करोना बाधितांची संख्या वाढत असून दुबई मार्गे परदेशातील नागरिक पुण्यात येत आहे. हे नागरिक विमानतळावर आल्यानंतर त्यांची आरोग्य तपासणी तसेच त्यांनी केलेल्या प्रवासाची माहिती घेऊन ते संशयित असल्यास त्यांना डॉ. नायडू सांसर्गिक रुग्णालयात उपचारासाठी दाखल करून घेतले जात आहे. तर उर्वरित प्रवाशांना पुढील 14 दिवस विलगीकरण करण्याच्या सूचना देऊन त्यांच्याशी दररोज संपर्क ठेवला जात आहे.

मात्र, आता रुग्णांची संख्या वाढल्याने प्रशासनाकडून परदेशातून आलेल्या सर्वच नागरिकांना 24 तास निरीक्षणाखाली ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. हे नागरिक उच्चवर्गीय तसेच परदेशातून आलेले असल्याने त्यांच्याकडून शासकीय आरोग्य सेवेबाबत प्रश्‍न उपस्थित केले जातात तसेच सुविधा नसल्याची तक्रार केली जाते. त्यामुळे या परदेशातून आलेल्या नागरिकांना “फाईव्ह स्टार’ पाहूणचार देण्यात येणार आहे.

…या असणार सुविधा
विलगीकरण कक्षातील नागरिकांसाठी साबण, शॅम्पू, खोलीत वापरण्यासाठी स्वतंत्र चप्पल, सॅनिटाझर, टुथपेस्ट, ब्रश, दाढीची क्रीम, रेजर, गरम पाण्यासाठी गीझर, 24 तास मनोरंजनासाठी प्रत्येक खोलीस स्वतंत्र टीव्ही असणार आहे. याशिवाय, या नागरिकांच्या जेवणाची स्वतंत्र सुविधाही असणार आहे. या सुविधांमुळे नागरिक घरी जाण्याऐवजी विलगीकरण कक्षात जातील आणि घरी गेल्यानंतर नातेवाईकांना आजाराचा संसर्ग होण्याच्या घटना थांबतील, या उद्देशाने या सुविधा देण्यात येणार आहेत.

Leave a Comment