पुणे जिल्हा | वाल्हे परिसरातील फूल उत्पादक कोमेजला

वाल्हे, (वार्ताहर)- यावर्षी पाण्याअभावी फूलशेती अडचणीत आली आहे. मोठ्या प्रमाणात खर्च करूनही लागवड केलेली फुलझाडे विहिरी, बोअरचे पाणी आटल्याने सुकून जात आहेत. त्यात सद्यःस्थितीत लग्नसराई नसल्याने फुलांचे भावही गडगडल्याने फूल उत्पादक अडचणीत सापडले आहेत.

वाल्हे (ता. पुरंदर) परिसरातील शेतकरीवर्ग मागील काही वर्षांपासून परंपरागत शेती सोडून इतर शेती व्यवसायाकडे वळत, शेतकर्‍यांनी फूलशेतीकडे लक्ष केंद्रित केले होते; मात्र मागील वर्षी अतिअल्प पर्जन्यमान झाल्यामुळे, तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली. विहिरी, बोअरवेलचे पाणी आटल्याने इतर बागायती शेतीबरोबरच फुल शेतीही नष्ट होत आहे. फुलझाडे आता पाण्याअभावी करपू लागली आहे. यंदा फारशा लग्नतिथी नसल्याने फुलांची मागणीही घटल्याने दरात मोठी घसरण झाली.

कमी खर्च, कष्ट कमी आणि शाश्वत उत्पन्न असं फुलशेतीचं समीकरण लक्षात घेऊन, झेंडू, गुलछडी, जर्मन, मोगरा या विविध फुलांच्या लागवडीतून आर्थिक प्रगती साधण्याचा प्रयत्न करीत होता. मागील वर्षी एप्रिल, मे महिन्यात मोगरा फुलांना एक हजार ते बाराशे रूपयांपर्यंत बाजारभाव मिळत होता; मात्र यावर्षी दुष्काळसदृश परिस्थिती असतानाही, फक्त 200 ते 250 रुपयांपर्यंत कवडीमोल बाजारभाव मिळत असल्याने, फूल उत्पादक शेतकरीवर्ग आर्थिक संकटात सापडत आहेत.

यावर्षी पाणीटंचाई तीव्र निर्माण झाल्याने, शेतीसाठी पाणीटंचाई निर्माण झाली आहे. यातच, सद्यःस्थितीत लग्नतिथी कमी असल्याने फुलांची मागणी घटली असल्याने, फुलांचे दर मोठ्या प्रमाणात घसरले आहेत. कवडीमोल भावाने फुले विक्री होत असल्याने, अतिअल्प पाण्यावर पिकवलेली फुले कवडीमोल भावाने (200रुपये किलो) द्यावी लागत आहेत. -किसन पवार, फूल उत्पादक शेतकरी वाल्हे.

लग्न व इतर समारंभात स्टेज व इतर सजावटीसाठी अनेक ठिकाणी प्लॅस्टिकच्या फुलांचा वापर होत असल्याने, शेतकर्‍यांच्या फुलांची मागणी दिवसेंदिवस घटत आहे; त्यामुळेही फुलांच्या दरात दिवसेंदिवस घसरण होत आहे. तसेच यामुळे भविष्यात फूलशेतीवर संकट येण्याचे चित्र आहे. -सागर भुजबळ, फूल उत्पादक शेतकरी वाल्हे.