विदेश वृत्त : अफगाणिस्तानसंबंधातील व्यवहारांसाठी पाकिस्तानात “स्पेशल सेल’

इस्लामाबाद – अफगाणिस्तानसंदर्भातील विविध व्यवहारांसाठी पाकिस्तानात एका विशेष सेलची स्थापना करण्यात आली आहे. पंतप्रधान इम्रान खान यांनी शुक्रवारी ही घोषणा केली. ज्या विभागांसाठी हा सेल कार्यरत राहणार आहे.

त्यामध्ये आंतरराष्ट्रीय मानवतावादी सहकार्य आणि पाकिस्तानमध्ये घुसखोरी रोखण्यासाठी सीमेवरील व्यवस्थापनाच्या विषयांचाही समावेश आहे, असे पंतप्रधानांच्या कार्यालयाने प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. अफगाणिस्तानमधील सध्याच्या परिस्थितीच्या पार्श्‍वभूमीवर खान यांनी “नॅशनल सिक्‍युरीटी कमिटी’शी सुरक्षाविषयक विविध मुद्‌द्‌यांवर चर्चा केली.

पाकिस्तानातील सुरक्षा विषयक सर्व मुद्‌द्‌यांवर निर्णय घेणारी “नॅशनल सिक्‍युरीटी कमिटी’ ही सर्वोच्च संस्था आहे. या कमिटीमध्ये प्रांतीय मंत्री, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार, सुरक्षा दलांचे प्रमुख आणि गुप्तचर संस्थांच्या प्रमुखांचाही सहभाग असतो.

काही दिवसांपूर्वी पाकिस्तानचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार मोईद युसुफ यांनी अमेरिकेच्या परराष्ट्र उपमंत्री वेंडी शेरमन यांच्याशीही चर्चा केली होती. अफगाणिस्तानात नव्याने स्थापन झालेल्या तालिबानच्या सरकारला जगाने लवकरच मान्यता द्यायला हवी, अशी अपेक्षाही त्यांनी शेर्मन यांच्याकडे व्यक्त केली होती.