अग्रलेख : अमेरिकेतील क्रिकेट

फूटबॉल, बेसबॉल आणि टेनिस यासारख्या व्यावसायिक खेळांसाठी प्रसिद्ध असलेल्या अमेरिकेमध्ये आता क्रिकेट रुजणार आहे. इंटरनॅशनल क्रिकेट काउन्सिल आयोजित टी-20 क्रिकेट विश्‍वचषक स्पर्धेला उद्यापासून अमेरिकेमध्ये प्रारंभ होणार असल्यामुळे येत्या महिन्याभराच्या कालावधीमध्ये अमेरिकेमध्ये क्रिकेटची चर्चा होणार आहे. जगभरातील 20 देश या विश्‍वचषक स्पर्धेमध्ये भाग घेणार असल्याने आतापर्यंतची ही सर्वात मोठी विश्‍वचषक स्पर्धाही ठरणार आहे. अमेरिका आणि वेस्ट इंडिज यांच्या संयुक्त विद्यमाने ही स्पर्धा होणार असली तरी त्यामध्ये अमेरिकेचा वाटा मोठा आहे. या निमित्ताने अमेरिकेसारख्या मोठ्या देशामध्ये क्रिकेटचे वातावरण तयार होणार आहेच शिवाय ज्या देशांमध्ये अद्याप क्रिकेट लोकप्रिय झालेले नाही त्या देशांनासुद्धा आंतरराष्ट्रीय पातळीवरील संघांसोबत खेळण्याची संधी उपलब्ध होणार आहे. या स्पर्धेतील काही संघांवर नजर टाकली तर पहिल्यांदाच क्रिकेटच्या मैदानावर आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्पर्धेमध्ये हे देश सहभागी होणार आहेत.

गेल्या काही वर्षांपासून काही ठराविक देशांमध्ये लोकप्रिय असलेला क्रिकेटचा खेळ जगाच्या कानाकोपर्‍यातही पोहोचवण्याचे उद्दिष्ट या निमित्ताने सिद्ध होऊ शकेल. भारतासाठी विचार करायचा झाल्यास यावेळी तरी भारत विश्‍वचषक स्पर्धा जिंकणार आहे की नाही हीच एक शंका प्रत्येकाच्या मनात आहे. जगातील सर्वात प्रभावशाली संघ म्हणून गेल्या कित्येक वर्षांपासून नाव कमावलेल्या क्रिकेट क्रमवारीत अग्रस्थानी असलेल्या भारतीय क्रिकेट संघाला गेल्या 13 वर्षांपासून आयसीसी पुरस्कृत कोणत्याही विश्‍वचषक स्पर्धेमध्ये विजेतेपद मिळवता आलेले नाही. गेल्या काही वर्षांच्या कालावधीत झालेल्या कोणत्याही विश्‍वचषक स्पर्धेच्या अंतिम किंवा उपांत्य फेरीपर्यंत धडक मारलेल्या भारताला विश्‍वचषकावर मात्र नाव कोरता आलेले नाही. गेल्या वर्षी भारतात झालेल्या एकदिवसीय क्रिकेट विश्‍वचषक स्पर्धेतही अंतिम फेरीपर्यंत अपराजित राहिलेल्या भारताला अंतिम फेरीमध्ये मात्र ऑस्ट्रेलियाकडून हार पत्करावी लागली होती आणि पुन्हा एकदा विश्‍वचषकापासून वंचित राहावे लागले होते.

साहजिकच अमेरिकेत होणार्‍या या विश्‍वचषक स्पर्धेमध्येतरी भारत विजेता ठरणार की नाही याची उत्सुकता सर्वांना आहे. नेहमीप्रमाणेच क्रिकेट तज्ज्ञांनी यावेळी पुन्हा एकदा फेव्हरेट संघाच्या यादीमध्ये भारताचा समावेश केला आहे. या तज्ज्ञांची आणि चाहत्यांची ही अपेक्षा पूर्ण करण्याची जबाबदारी भारतीय क्रिकेट संघाला पार पाडावी लागणार आहे. कित्येक वर्षांपासून भारतीय क्रिकेटचा अविभाज्य भाग असलेले विराट कोहली आणि रोहित शर्मा या महान फलंदाजांची ही कदाचित शेवटची विश्‍वचषक स्पर्धा असणार आहे. या स्पर्धेमध्ये देदीप्यमान कामगिरी करून भारतीय क्रिकेट संघाने विश्‍वचषक जिंकून ती भेट या दोन महान फलंदाजांना द्यावी. अनुभवी खेळाडू आणि नवोदित खेळाडू यांचे उत्तम मिश्रण असलेल्या विद्यमान भारतीय संघामध्ये निश्‍चितच विश्‍वचषक स्पर्धा जिंकण्याचे गुण आहेत. क्रिकेटच्या तीनही प्रकारांपैकी टी20 या क्रिकेट प्रकारामध्ये भारताने गेल्या काही वर्षांमध्ये आपली आघाडी कायम ठेवली आहे.

नुकताच आयपीएलचा हंगाम संपला असल्याने बहुतेक भारतीय खेळाडूंना या झटपट क्रिकेटचा चांगला अनुभवही मिळाला आहे. त्या अनुभवाचे विजयात रूपांतर करण्याचे काम भारतीय संघ करतो की नाही हे पाहणेच महत्त्वाचे ठरणार आहे. ही स्पर्धा अमेरिकेत होणार असल्याने तेथील खेळपट्ट्या कशा आहेत याचा अंदाज कोणत्याच संघाला नाही. पहिल्या काही सामन्यांनंतर या खेळपट्ट्यांचा अंदाज येण्यास सुरुवात होईल. पण ज्या प्रकारे या स्पर्धेची रचना करण्यात आली आहे ते पाहता जागतिक क्रमवारीतील वरचे आठ देश पुढील फेरीत जाणार हे निश्‍चित आहे. पण त्यानंतरच्या फेरीत मात्र भारतासह सर्वच देशांना आव्हानांचा मुकाबला करावा लागणार आहे. उपांत्य फेरीचा किंवा अंतिम फेरीचा कोणताही दबाव न घेता नैसर्गिकरित्या खेळणार्‍या संघालाच विश्‍वचषकावर नाव कोरता येते असे आजपर्यंत सिद्ध झालेले आहे. भारतीय संघामध्ये ज्या खेळाडूंचा भरणा करण्यात आला आहे त्यामध्ये अनेकजण नैसर्गिक खेळ करण्यासाठी प्रसिद्ध आहेत.

यशस्वी जयस्वाल, रोहित शर्मा, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत यासारख्या फलंदाजांनी जर आपल्या क्षमतेप्रमाणे खेळ केला तर जसप्रीत बुमरा आणि अन्य गोलंदाजांची आघाडी निश्‍चितपणे कोणत्याही खेळपट्टीवर भारताला विजय मिळवून देऊ शकते. आंतरराष्ट्रीय स्पर्धेमध्ये जरी अनेक देश सहभागी होत असले तरी क्रिकेटमध्ये मात्र भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामन्याची सर्वांना उत्सुकता असते. यावेळीसुद्धा 9 जून रोजी अमेरिकेत होणार्‍या भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामन्याची चर्चा आतापासूनच सुरू झाली आहे. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील क्रिकेट सामना नेहमीच हाय व्होल्टेज ड्रामा असतो आणि यावेळी पुन्हा एकदा तो अनुभवायला मिळणार आहे. ज्या प्रकारे या सामन्यासाठी तिकिटांच्या किमतीमध्ये प्रचंड वाढ करण्यात आली आहे तरीसुद्धा प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद मिळालेला आहे.

अर्थात या स्पर्धेमध्ये केवळ पाकिस्तानला हरवणे हा उद्देश न ठेवता विश्‍वचषकावर नाव कोरणे हेच भारतीय संघाचे ध्येय असायला हवे. 2007 मध्ये जेव्हा टी20 विश्‍वचषक स्पर्धा सुरू झाली तेव्हा या स्पर्धेच्या पहिला हंगामात विजेतेपद मिळवलेल्या भारताला नंतर अनेक दिग्गज संघात असूनही ही स्पर्धा जिंकता आलेली नाही. त्यामुळे क्रिकेट या खेळाचा एक प्रकारे जागतिक दूत असलेल्या भारतीय क्रिकेट संघाने यावेळी विश्‍वचषक स्पर्धा जिंकून आपणच या चषकासाठी सर्वात पात्र कसे आहोत, हे सिद्ध करून दाखवायची हीच वेळ आहे.