मंथन : शशिकला यांचे भवितव्य?

-हेमंत देसाई

अण्णाद्रमुकच्या दिवंगत नेत्या व तमिळनाडूच्या माजी मुख्यमंत्री जयललिता यांच्या सहकारी व्ही. के. शशिकला यांची गेल्या आठवड्यात तुरुंगातून सुटका करण्यात आली. त्यामुळे तमिळनाडूतील राजकारणास वेग आला आहे.

भ्रष्टाचाराच्या आरोपावरून त्यांना ठोठावण्यात आलेली ही शिक्षा चार वर्षांची होती. परप्पाण्णा अग्रहारा तुरुंगात त्या शिक्षा भोगत होत्या. करोनासंक्रमित आढळल्यानंतर त्या रुग्णालयात उपचार घेत होत्या.
जयललिता यांच्या निधनानंतर पक्षाचे व राज्याचे नेतृत्व आपल्याकडे यावे, अशी शशिकला यांची महत्त्वाकांक्षा होतीच; परंतु नेमके त्याचवेळी 66 कोटी रुपयांच्या बेहिशेबी संपत्ती प्रकरणात त्या अडकल्या. त्यापूर्वीच्या काळात खुद्द जयललिता यांनाही भ्रष्टाचाराच्या भानगडीत तुरुंगात जावे लागले होते. शशिकला यांना ज्या प्रकरणात शिक्षा भोगावी लागली, तशीच सजा त्यांचे नातलग जे. इलावारसी तसेच जयललिता यांचा मानलेला मुलगा बी. एन. सुधाकरन यांनाही ठोठावण्यात आली होती. शशिकला यांच्या मुक्‍ततेनंतर लगेच त्यांचा भाचा आणि मक्‍कल मुन्नेत्रकळघमचे महासचिव टीटीव्ही दिनकरन त्यांची भेट घेण्यासाठी गेले होते, हे अर्थपूर्ण आहे.

एम. जी. रामचंद्रन हे तमिळनाडूचे मुख्यमंत्री होते, तेव्हा जयललिता या अण्णाद्रमुकच्या प्रचारप्रमुख होत्या. त्यावेळी शशिकला यांचे यजमान एम. नटराजन हे सरकारमध्ये पीआरओ होते. त्याचवेळी एका सनदी अधिकाऱ्यांच्या माध्यमातून शशिकला यांची जयललिता यांच्याशी भेट झाली. एमजीआर यांच्या निधनानंतर त्यांचा वारसा जयललिता यांच्याकडे येईल, असे वाटले होते; परंतु त्यांच्या पत्नी जानकी रामचंद्रन या मुख्यमंत्री झाल्या. त्या उपेक्षेच्या कालावधीत जयललिता व शशिकला यांच्यातील मैत्री वाढली. शशिकला या जयललिता यांच्यासोबत त्यांच्या घरातच राहत होत्या. शशिकला यांच्या सुधाकरन या भाच्यास जयललिता यांनी 1995 साली दत्तक घेतले. मात्र पुढच्याच वर्षी, 1996 मध्ये त्याच्याशी आपला कोणताही संबंध नसल्याचे जयललिता यांनी जाहीरही केले होते.

सुधाकरनच्या पंचतारांकित विवाह सोहळ्यामुळे जयललिता प्राप्तिकर खात्याच्या रडारवर आल्या. पुढे जयललिता निवडणुकीत हरल्या आणि शशिकला यांची त्यांनी घरातून हकालपट्टी केली. त्यानंतर काही वर्षांनी शशिकला यांना जयललिता यांनी पुन्हा जवळ केले. अण्णाद्रमुकमध्ये शशिकला या तेव्हा अत्यंत महत्त्वाच्या नेत्या बनल्या होत्या. त्या काळात शशिकला यांच्या महत्त्वाकांक्षा वाढू लागल्याचे लक्षात आल्यानंतर, जयललिता यांनी त्यांना पुन्हा एकदा दरवाजा दाखवला.

गेल्या 50 वर्षांत तमिळनाडूत कोणत्याही राष्ट्रीय पक्षाने राज्य केलेले नाही. तमिळनाडूत जो प्रादेशिक पक्ष सत्तेवर असतो, तो केंद्रातल्या सत्ताधारी पक्षाशी आघाडी करतो. मग तो पक्ष कॉंग्रेस असो वा भाजप. तमिळनाडूत द्रमुक व अण्णाद्रमुक यांची सामान्यतः आलटून पालटून सत्ता येते आणि त्यांच्या राज्यातील आघाडीत राष्ट्रीय पक्ष हे दुय्यम भूमिकेत असतात. जयललिता यांचा मृत्यू झाल्यानंतर अण्णाद्रमुकमध्ये संघर्ष सुरू झाला. शशिकला व दिनकरन यांनी आपला खेळ करण्यास सुरुवात केली; परंतु त्याचा काही उपयोग झाला नाही.

आता तमिळनाडूच्या मुख्यमंत्रिपदी पलानीस्वामी आणि उपमुख्यमंत्रिपदी पनीरसेल्वम हे असून, पक्षात शशिकला यांना कोणतेही स्थान नसेल, हे या उभयतांनी स्पष्ट केले आहे. शशिकला तुरुंगात असताना, त्यांची सुटका झाल्यानंतर त्याच मुख्यमंत्री होतील, असा सूरही उमटला नाही. शशिकला या शिक्षा भोगलेल्या गुन्हेगार असून, सहा वर्षे त्या निवडणूक लढवू शकणार नाहीत वा सार्वजनिक पदावर जाऊ शकणार नाहीत. या स्थितीत अण्णाद्रमुक आपल्या मुठीत घेण्याचे त्यांचे प्रयत्न यशस्वी होतील, असे मुळीच दिसत नाही. अशावेळी त्यांना दिनकरन यांच्या पक्षात जाण्याचा पर्याय उपलब्ध आहे. या पक्षाने अण्णाद्रमुकची पाच टक्‍के मते आपल्याकडे खेचून घेतलेली आहेत. कोणत्याही विधानसभा निवडणुकीत पाच टक्‍के मते ही कमी नाहीत. तमिळनाडूसारख्या चुरशीच्या राज्यात तर नव्हेच नव्हे.

तमिळनाडूत विधानसभा निवडणुका तोंडावर आल्या असून, यावेळी सत्तापालट घडवण्याचा पण द्रमुकचे अध्यक्ष एम. के. स्टालिन यांनी केला आहे. तर भाजप आणि अण्णाद्रमुक यांची आघाडी असून, यावेळी भाजपला अधिक यश मिळेल, या दृष्टीने डावपेच आखले जात आहेत. भाजपचे प्रमुख नेते चेन्नई, कोईमतूर, तिरुनेरवेली, टेंकासी, सेलम, रामनाथपुरम या शहरांचा दौरा करणार आहेत. लोकसभा निवडणुकीतही अण्णाद्रमुक-भाजप आघाडी होती आणि विधानसभेतही ती असणारच आहे.
2011 साली जयललिता यांनी मदुराईमध्ये निवडणूक प्रचारास सुरुवात केली आणि राज्यात सत्ता मिळवली. यावेळीही अण्णाद्रमुक-भाजपची सत्ता येईल आणि भाजपला दोन आकडी जागा मिळतील, असा दावा केला जात आहे. शशिकला कोणती राजकीय भूमिका घेतात, त्यावर त्यांच्या सुटकेचा परिणाम किती होतो, हे ठरेल, असे प्रतिपादन भाजपचे प्रदेशाध्यक्ष एल. मुरुगन यांनी केले आहे.

जयललिता यांच्या मृत्यूनंतर बंडखोर नेते ओ. पनीरसेल्वम यांना पक्षांतर्गत लढाईत पराभूत करण्यात शशिकला यशस्वी झाल्या, परंतु नंतर त्यांचे विश्‍वासू सहकारी पलानीस्वामी यांनीही त्यांना दगा दिला. त्यांनी व पनीरसेल्वम यांनी मिळून शशिकला यांची पक्षातून हकालपट्टी केली. समजा शशिकला यांचा गट उद्या अण्णाद्रमुकमध्ये विलीन झाला तर पक्षाची ताकद वाढेल; परंतु शशिकला यांचे पक्षात पुनरागमन झाल्यास आपला प्रभाव ओसरेल, अशी भीती पलानीस्वामींना वाटते. सध्यातरी शशिकला यांचे भवितव्य अधांतरी आहे.

Leave a Comment