बीरभूम जळीतकांड प्रकरणी मुंबईतून चौघांना अटक

रामपूरहाट (पश्‍चिम बंगाल) – बीरभूम जळीतकांड प्रकरणी सीबीआयने आज मुंबईतून चौघांना अटक केली. हे चौघेही मूळचे पश्‍चिम बंगालमधील रहिवासी असून बीरभूम जळीतकांडामध्ये त्यांचा कथित सहभाग होता, असे सीबीआयच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. या प्रकरणात कोलकाता उच्च न्यायालयाच्या आदेशांनुसार सीबीआयने तपासाला सुरुवात केल्यावर ही पहिलीच अटकेची कारवाई झाली आहे.

अटक करण्यात आलेले चौघेजण या घटनेनंतर मुंबईमध्ये पळून आले होते. त्यांना आज पहाटेच्या सुमारास अटक करण्यात आली. या चौघांपैकी बाप्पा आणि शाबू शेख यांच्या नावांचा उल्लेख “एफआयआर’मध्ये करण्यात आला आहे. त्यांना मुंबईतील न्यायालयासमोर हजर करण्यात येईल आणि पश्‍चिम बंगालला नेण्यासाठी ट्रान्झिट रिमांडची मागणी केली जाईल, असेही अधिकाऱ्यांनी सांगितले.

पश्‍चिम बंगालमधील बीरभूम जिल्ह्यातल्या बोगतुई गावात तृणमूल कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांनी 21 मार्चच्या रात्री लावलेल्या आगीमध्ये 9 जणांचा होरपळून मृत्यू झाला होता. या प्रकरणाच्या तपासासाठी पश्‍चिम बंगाल सरकारने विशेष तपास पथक देखील स्थापन केले आहे.