नागपुरात करोनाचे आणखी चार रुग्ण आढळले

नागपुर: नागपुरात करोनाचे आणखी चार रुग्ण सापडल्याने शहरात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. करोनाची लागण झालेल्यांमध्ये दोन महिला आणि दोन पुरुषांचा समावेश आहे. यासोबत नागपुरातील करोनाबाधितांची संख्या ७७ वर पोहोचली आहे. महत्त्वाची बाब म्हणजे हे सर्वजण सतरंजीपुरा येथे करोनामुळे मृत्यू झालेल्या रुग्णाच्या संपर्कात आले होते. सर्वांना विलगीकरणात ठेवण्यात आले आहे. यामधील तिघांना आमदार निवासात विलगीकरणात ठेवण्यात आले असून एकाला लोणारा येथे विलगीकरणात ठेवण्यात आलेले आहे.

नागपुरात आतापर्यंत १२ जणांना उपचार करुन घरी सोडण्यात आलेले आहे. नागपूरमधील सतरंजी भागात वास्तव्यास असणाऱ्या ६८ वर्षीय व्यक्तीचा करोनामुळे ५ एप्रिल रोजी मृत्यू झाला होता. मृत्यू झाल्यानंतर तपासणी केली असताना त्यांनी करोनाची लागण झाली असल्याचे निष्पन्न झाले होते. सुरुवातील न्यूमोनिया झाल्याची तक्रार असल्याने त्यांनी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. पण करोनाची लागण झाली असल्याचे  समोर आल्यानंतर आरोग्य विभागाची धावपळ सुरु झाली होती. या रुग्णाच्या संपर्कात आल्याने आतापर्यंत ४० हून जास्त जणांना करोनाची लागण झाली असल्याचे  निष्पन्न झाले आहे.

महापालिका मृत रुग्णाच्या संपर्कात आलेल्या सर्वांची वैद्यकीय चाचणी करत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, १९२ लोक या रुग्णाच्या संपर्कात आले होते. यामधील ८३ जण हे शेजारी, नातेवाईक आणि परिसरातील नागरिक होते. आतापर्यंत प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष संपर्कात आलेल्या जवळपास ४० हून जास्त जणांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी संपर्कात आलेल्या लोकांना पुढे येऊन आरोग्य विभागाशी संवाद साधण्याचे आवाहन केले आहे.

Leave a Comment