गुजरातच्या कारागृहातून चार कैदी फरारी; असा होता मास्टर प्लॅन….

गुजरात – शनिवारी पहाटे गुजरातच्या आनंद जिल्ह्यातील बोरसद शहरातील सब-जेलमधून चार कच्चे कैदी फरार झाले आहेत. यांना पकडण्यासाठी पोलिसांनी कारवाई सुरू केली आहे. ही घटना पहाटे 3.30 ते पहाटे 4 च्या दरम्यान घडली, असे पोलीस अधीक्षक प्रवीण कुमार यांनी सांगितले.

खून, बलात्कार आणि दारूबंदीचे गुन्हा दाखल असलेल्या बोरसद उप कारागृहातील या चार कैद्यांनी गेटच्या लोखंडी पट्टीखालील लाकडी भाग करवतीच्या सहाय्याने कापून पळ काढण्यात यश मिळविले.

फरारी झालेल्या या चार कैद्यांपैकी एकावर खुनाचा, दोन मुलांवर लैंगिक अत्याच्याराच्या संबंधात पोस्को कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल आहे.

“आम्ही विविध ठिकाणी बॅरिकेड्‌स लावले आहेत आणि त्यांना पकडण्यासाठी कोम्बिंग ऑपरेशन सुरू केले आहे असे पोलिसांनी सांगितले. पळून गेलेल्यांपैकी एकाचा शोध लागला, पण तो पुन्हा एका शेतातून पळून जाण्यात यशस्वी झाला.