चार शिक्षकांची “टीईटी’ची प्रमाणपत्रे बोगस

डॉ. राजू गुरव
पुणे  – शाळांमधील शिक्षकांची नोकरी कायम राहावी यासाठी मुंबई येथील चार शिक्षकांनी शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) उत्तीर्ण झाल्याची बोगस प्रमाणपत्रेच तयार करण्याची शक्‍कल लढविली आहे.

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे करण्यात आलेल्या प्रमाणपत्राच्या तपासणीद्वारे हे बोगस प्रमाणपत्रांचे प्रकरण उघडकीस आले आहे. गुरुजींचा हा अजब प्रताप धक्कादायकच म्हणावा लागणार आहे. आता या शिक्षकांवर शिक्षणाधिकाऱ्यांकडून कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे.

राष्ट्रीय शिक्षक शिक्षण परिषदेने सन 2013 पासून प्राथमिक शाळांमध्ये शिक्षकांच्या नोकरीसाठी “टीईटी’ परीक्षा उत्तीर्ण होण्याचे बंधन घातले होते. आतापर्यंत 5 वेळा “टीईटी’ परीक्षा घेण्यात आल्या असून यात 69 हजार 709 उमेदवार उत्तीर्ण झालेले आहेत. दि. 4 जुलै 2018 ते 11 ऑक्‍टोबर 2019 या कालावधीत राज्य परीक्षा परिषदेकडे एकूण 306 “टीईटी’ची प्रमाणपत्रे पडताळणीसाठी शिक्षणाधिकाऱ्यांकडून सादर करण्यात आली होती.

या सर्वच प्रमाणपत्रांची कसून तपासणी करण्यात आली आहे. यात प्रामुख्याने सर्वाधिक मुंबई येथील शाळांमधील शिक्षकांचीच “टीईटी’ची प्रमाणपत्रे तपासणीसाठी दाखल झाली होती. यात नुकतीच चार शिक्षकांची प्रमाणपत्रे बोगस असल्याचे या प्रकरणातून स्पष्ट झाले आहे.

बोगस प्रमाणपत्रांचा असा लागला शोध
बोगस प्रमाणपत्रे आढळून आलेले संबंधित शिक्षक गेल्या वर्षी 15 जुलै रोजी झालेल्या “टीईटी’ परीक्षेला बसले होते. यात हे चौघेही अनुत्तीर्ण झाले होते. मात्र त्यांनी उत्तीर्ण झाल्याने बोगस प्रमाणपत्र तयार करून घेतले आहे. सन 2017 पर्यंत प्रमाणपत्राचे स्वरुप वेगळे होते. सन 2018 पासून प्रमाणपत्राच्या स्वरुपात खूप बदल करण्यात आलेले आहेत. यात 17 सिक्‍युरिटी फिचर्सचा समावेश करण्यात आलेला आहे. तपासणीत प्रमाणपत्राचा क्रमांक, साईज, स्वरुप, बारकोड नंबर यात विसंगती आढळून आली आहे.

Leave a Comment