पुणे जिल्हा | अनंतराव पवार इंग्लिश स्कूलमध्ये मोफत सायकल वाटप

भिगवण, (वार्ताहर) – खासदार व विद्या प्रतिष्ठान संस्थेच्या विश्वस्त सुप्रिया सुळे यांच्या हस्ते अनंतराव पवार इंग्लिश स्कुल, चिंचोली (ता. दौंड) येथे मुलींसाठी मोफत सायकल वाटप करण्यात आले.

याप्रसंगी विद्या प्रतिष्ठान संस्थेच्या सचिव ड. निलीमा गुजर उपस्थित होत्या. कार्यक्रमासाठी विद्यार्थी व पालक वर्गासोबत पत्रकार, भिगवण रोटरी क्लबचे सदस्य, महिला बचत गट व आजूबाजूच्या गावातील सरपंच, पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमात एकूण 57 सायकलींचे वाटप विद्यार्थिनींना करण्यात आले.

शाळेच्या मुख्याध्यापिका सरीता शिंदे यांनी विद्यार्थ्यांनी शैक्षणिक व सह शालेय उपक्रमात कमावलेल्या यशाबद्दल माहिती दिली. खा. सुप्रिया सुळे यांच्या हस्ते राज्यस्तरीय पिंच्याक सिलाट स्पर्धेत कांस्य पदक पटकावून घवघवीत यश मिळवलेल्या स्वागत मलगुंडे या विद्यार्थ्याचा सत्कार करण्यात आला.

दीपस्तंभ चॅरिटेबल ट्रस्ट आयोजित राज्यस्तरीय ’स्कूल संसद’ या उपक्रमात सहभागी होऊन उल्लेखनीय यश प्राप्त केलेल्या शाळेतील शिक्षिका दिपा भोईटे तसेच वैष्णवी जाधव, संस्कार भोसले व जुई खुटाळे या विद्यार्थ्यांचा देखील सत्कार करण्यात आला. प्रास्ताविक दीपा भोईटे, सूत्रसंचालन ज्योत्स्ना पाटील यांनी तर निर्मला अडेपल्ली यांनी आभार मानले. मुख्याध्यापिका सरिता शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांच्या समन्वयाने कार्यक्रम यशस्वीरित्या पार पडला.