स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त गावातील नागरिकांसाठी मोफत नेत्र तपासणी

रांजे – (ता.भोर) येथील स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त भोरच्या गटविकास अधिकारी स्नेहा देव व सहाय्यक गटविकास अधिकारी राजेंद्र चांदगुडे यांच्या मार्गदर्शनाखाली गावातील नागरिकांसाठी ग्रामपंचायत रांजे व कृषी महाविद्यालय पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने डॉक्टर मनोहर डोळे फाउंडेशन पुणे मार्फत मोफत नेत्र तपासणी शिबीर आयोजित करण्यात आले होते. त्या शिबिरास गावातील नागरिकांनी मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदवून तपासणीचा लाभ घेतला.

छत्रपती शिवराय तसेच इतर थोर पुरुषांच्या प्रतिमेस सरपंच सुप्रिया जायकर, ग्रा.पं. सदस्य अभिजित कांबळे, मारुती गुजर यांनी पुष्पहार अर्पण करून शिबिराचे उद्घाटन केले. फाउंडेशनचे डॉ. राम अष्टेकर व पंकज गुरव यांनी गावातील ५१ नागरीकांची नेत्र तपासणी केली. त्यामध्ये पाच नागरीकांना मोतीबिंदू असल्याचे आढळून आल्याने त्यांना पुणे येथे अल्प दरामध्ये मोतीबिंदू ऑपरेशन साठी पाठविण्यात आले असल्याचे ग्रामसेवक भूषण पुरोहित यांनी सांगितले. कृषी विद्यापीठाचे विद्यार्थी असल्याने शिबिरामध्ये सहभागी झालेल्या शेतकऱ्यांना शेतीविषयक मार्गदर्शन केले. खरीप हंगामातील पिकांसाठी कशाप्रकारे काळजी घ्यावी लागते, शेती पिकांचे जास्तीत जास्त कसे उत्पादन घेता येईल याबाबत सविस्तर माहिती दिली. या कार्यक्रमासाठी गावातील आशा सेविका श्रीमती जांभुळकर, महेश जायकर, बाबासो भणगे यांनी विशेष परिश्रम घेतले. यावेळी ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक भूषण पुरोहित यांनी कार्यक्रमातील मान्यवर व विद्यालयातील अधिकाऱ्यांचे आभार मानले.