पिंपरी | आत्करगावात टँकरने मोफत पाणीपुरवठा

खालापूर, (वार्ताहर) – – सुधाकर घारे यांनी घेतला पुढाकार खालापूर तालुक्यातील बहुतांश भागात अनेकांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. अनेक ठिकाणची पाणीटंचाई दूर करण्यासाठी सामाजिक संस्था, राजकीय व नेते मंडळी पुढाकार घेत पाणीपुरवठा करत आहेत. आत्करगाव येथे गेल्या चार दिवसांपासून पाणीपुरवठा होत नसल्याने ग्रामस्थ त्रस्त झाले होते. त्याची दखल राष्ट्रवादीचे नेते सुधाकर घारे यांनी घेत तात्काळ गावात टॅंकरने मोफत पाणीपुरवठा केला.

आत्करगाव येथील तलावाचे खोदकाम सुरू असल्याने तळ्यातील पाणी गढूळ झाले आहे. त्यामुळे गावात गढूळ पाणीपुरवठा होत असल्याची तक्रार ग्रामस्थांनी केली होती. गढूळ पाणी पुरवठा बंद करून स्वच्छ पाणी पुरवठा करावी, अशी ही मागणी केली होती, परंतु, ग्रामपंचायतला या समस्येचे निवारण करता न आल्याने गावात चार दिवस पाणीपुरवठा बंद होता.

त्यामुळे गावकऱ्यांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत होता. ग्रामस्थांनी वेळोवेळी ग्रामपंचायतकडे पाठपुरावा केला असता ग्रामपंचायतीने त्यांच्या मागणीकडे दुर्लक्ष केले. अखेर सामाजिक कार्यकर्ते नितीन तवले, राष्ट्रवादीचे साजगाव पंचायत समिती अध्यक्ष नितीन पाटील, युवक अध्यक्ष ओमकार खेडेकर यांनी ही समस्या राष्ट्रवादीचे नेते सुधाकर घारे यांच्याकडे मांडली. त्यांनी टँकरने मोफत पाणीपुरवठा केला. त्याबद्दल ग्रामस्थांनी सुधाकर घारे यांच्या सामाजिक बांधिलकीचे कौतुक केले.