पाण्यासाठी संतप्त महिलांचा ग्रामपंचायतीवर मोर्चा

-आठ दिवसांत पाणीपुरवठा सुरळीत करण्याचे आश्‍वासन
-पढेगाव येथील ग्रामस्थांची पाण्यासाठीची वणवण अद्यापही थांबेना

पाण्याअभावी शौचालये शोभेची वास्तू
शासनाने हागणदारीमुक्त गावे करण्यासाठी अनुदान देऊन प्रत्येक गावात शौचालये बांधली आहेत. मात्र शौचालय वापरण्यासाठी मोठ्या प्रमाणात पाणी लागते. सध्या पिण्याच्या पाण्याची भ्रांत असल्याने शौचालयांसाठी पाणी कोण वापरणार. त्यामुळे ही शौचालये सध्या शोभेची वास्तू ठरल्या आहेत.

कोपरगाव – कोपरगाव तालुक्‍यातील पढेगाव येथे तीव्र उन्हाळ्यात पाणी मिळत नसल्याने संतप्त महिलांनी ग्रामपंचायत कार्यालयावर मोर्चा नेला. यावेळी सरपंच प्रकाश शिंदे यांनी आठ दिवसांत पाणीपुरवठा सुरळीत करण्याचे आश्‍वासन दिल्यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले.

पढेगाव ब्रिटीश काळापासून गोदावरी, पालखेड कालव्यांच्या लाभक्षेत्रात येते. त्यात आता नांदूर मधमेश्‍वर जलद कालव्याची भर पडली असून, दोन्ही कालव्यांना आवर्तन सुरू असतानाही पढेगावकरांची पाण्यासाठीची वणवण अद्याप थांबलेली नाही. दरवर्षी उन्हाच्या झला तीव्र झाल्यावर ग्रामस्थांना पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे. त्यामुळे संतप्त महिलांनी एकत्र येत ग्रामपंचायत कार्यालयावर मोर्चा नेऊन सरपंच, ग्रामसेवक आणि तलाठी यांना पाण्यासाठी साकडे घातले.

दरवर्षी उन्हाळा सुरू झाला की, गावातील महिलांसमोर पाणी टंचाईचा प्रश्‍न उभा राहतो. गावाची तहान भागविण्यासाठी जुने तीन आड होते. मात्र त्यांची पाणीपातळी खालावली. त्यामुळे ग्रामपंचायतीने तीन विहिरी खोदल्या. दुर्दैवाने दोन निरुपयोगी ठरल्या. माजी पोलीस पाटील कारभारी शिंदे यांनी दिलेल्या जमितील विहिरीवर सध्या गावाची भिस्त असून, या विहिरीनेही तळ गाठला आहे.

तालुकास्तरावरील तिन्ही नेत्यांशी घरोबा असलेले कार्यकर्ते गावात आहेत. मागील वेळी कोल्हे, तर यावेळी परजणेंच्या रूपाने गावाला पंचायत समितीवर स्थान मिळाले आहे. ग्रामपंचायतीवर निर्विवादपणे कोल्हे गटाचे वर्चस्व असूनही गावातली पाणी समस्या कायम आहे. शासकीय कर्मचारी गावात पाहुण्यांसारखे असल्याने त्यांना या समस्येचे गांभीर्य नसल्याची ग्रामस्थांत चर्चा आहे. कालवा आवर्तन काळात फक्त क्षणिक ओलावा असतो. त्यानंतर पुन्हा पाढे पंचावन्न ठरलेले आहे. ग्रामसेवकासह सर्वच शासकीय कर्मचारी गावात पाहुण्यासमान येतात.

ते सर्वच शहरनिवासी आहेत. गावात आलेच तर सोबत पाणीबाटली असते. ती संपताच घराचा रस्ता ते धरत असल्याने त्यांना पाणी समस्या ज्ञात असूनही त्यांनी तोंडावर पांघरुण घेतले आहे. पाणी समस्येची जाणीव होण्यासाठी त्यांनी सपत्नीक गावात राहावे, अशी मागणी महिलांनी केली. याबाबत सरपंच प्रकाश शिंदे यांनी आलेल्या महिलांना आठ दिवसांत पाणीपुरवठा करण्याचे आश्‍वास दिले. त्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.

Leave a Comment